भुकेने व्याकुळ पडलेला, जवळ कोणी जाईना...पण खाकी आली धावून ! 

सुधाकर पाटील 
शुक्रवार, 8 मे 2020

कोरोनामुळे माणूस माणसाच्या जवळ येत नाहीत. मात्र आम्हाला कर्तव्य म्हणून अडलेल्यांना मदत करावी लागते. तेच आम्ही केले. "त्या' मजुराबद्दल माहिती मिळताच त्याला तेथून आणून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 
-धनंजय येरूळे पोलिस निरीक्षक भडगाव 

भडगाव  : मुंबईहून चालत येणारा बिहार येथील मजूर हा कोठली फाट्याजवळ एका शेतात झाडाखाली दोन दिवसापासून भुकेने व्याकुळतेने पडलेला होता. कोरोनाच्या भीतीने त्याच्याजवळ कोणी जायला तयार नव्हते. जेव्हा या मजुराबद्दल भडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक धनंजय येरूळे व पोलिस कर्मचारी लक्ष्मण पाटील यांना समजताच त्यांनी "त्या' मजुराला दवाखान्यात दाखल केले. ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ त्याच्यावर उपचार सुरू केले. खाकीच्या या माणुसकीने भडगावकर भारावल्याचे पहायला मिळाले. 

नक्की वाचा : जळगावने गाठली शंभरी; नवे दहा कोरोना बाधित 
 

लॉकडाउनमुळे परप्रांतीय मजुराचे जथ्थेच्या जथ्थे पायी गावी निघाल्याचे चित्र रस्त्यावर दिसते. काही मजुरांना अन्न मिळणे ही अवघड झाले आहे. पण आपल्या गावी पोहचायचे आहे, म्हणून जो तो चालत निघाला आहे. अशातच काल बिहार येथील एक वयस्कर मजूर हा मुंबईहून बिहारला जाण्यासाठी पायी निघाला होता. तो दोन दिवसापूर्वी कोठली फाट्याजवळ एका शेतात झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी थांबला. मात्र त्याच्या पोटात अन्नच नसल्याने तो तिथेच पडून राहिला. ही बाब शेतकऱ्यांना समजल्यावर त्यांनी भडगाव पोलिस स्टेशनचे निरीक्षक धनंजय येरूळे यांना सांगितली. त्यांनी तत्काळ पोलिस कर्मचारी लक्ष्मण पाटील, संभाजी पाटील यांना सोबत घेत शेतकऱ्याच्या मदतीने भडगाव येथील कोविड केअर सेंटरला दाखल केले. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ त्याच्यावर उपचार सुरू केले. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. 

आर्वजून पहा : नऊ महिन्याची गरोदर...341 किमीची पायपीट अन्‌ रस्त्यावर न पाहवणारे दृश्‍य ​
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhadgaon hunger oreign workers but pollice help