अरे बापरे... पोषण आहारात निघाल्या अळ्या

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 April 2020

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खेळण्याचा प्रकार असल्याने पालकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या प्रकरणी गटशिक्षण अधिकारी भास्कर लहासे यांनी मुख्याध्याप बडगुजर यांना नोटीस बजावून खुलासा मागविला आहे. 

बोदवड  : कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे सध्या सर्व शाळा बंद आहेत. त्यामुळे शाळेत शिल्लक असलेला शालेय पोषण आहार सर्व विद्यार्थ्यांना समान वाटप करण्याच्या शासनाच्या सूचनेनुसार काल (ता. ९) न. ह. रांका हायस्कूलमध्ये इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना तांदूळ वाटप करण्यात आले. मात्र, यात अळ्या आढळल्याने खळबळ उडाली असून, गट शिक्षणाधिकारी भास्कर लहासे यांनी मुख्याध्यापक आर. जे. बडगुजर यांना नोटीस बजावून खुलासा मागविला आहे. 

आर्वजून पहा : "लॉकडाउन'मध्ये संकल्पना...तरुणाने थाटला "ऑनलाइन' भाजीबाजार  
 

येथील न. ह. रांका हायस्कूलमधील इयत्ता पाचवीतील राज सुरेश कोळी यालाही एक किलो तांदूळ मिळाले. त्या तांदुळात अळ्या निघून आल्या त्यामुळे पालक सुरेश कोळी यांनी मुख्याध्यापक आर. जे. बडगुजर यांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनी पुरवठादारांकडून असाच तांदूळ मिळाल्याचे उत्तर दिले. त्यानंतर पालकांच्या तक्रारीनुसार बीडीओ रमेश वाघ, सभापती किशोर गायकवाड व गट शिक्षणाधिकारी भास्कर लहासे यांनी घटनास्थळी भेट दिली. तांदुळाची पाहणी केली असता, त्यांनाही तांदळात अळ्या दिसून आल्या. प्रत्येक विद्यार्थ्यांना असे अळ्या असलेले तांदूळ मिळाल्याचा प्रकार समोर आल्याने हा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खेळण्याचा प्रकार असल्याने पालकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या प्रकरणी गटशिक्षण अधिकारी भास्कर लहासे यांनी मुख्याध्याप बडगुजर यांना नोटीस बजावून खुलासा मागविला आहे. 

नक्की वाचा : चाळीसगावातील सहा जण तपासणीसाठी जळगावला आणले 
 

तांदूळ वाटप करताना अळ्या निघाल्याची तक्रार मिळताच शाळेत जाऊन पाहणी केली. यावेळी तक्रारीनुसार धान्यात अळ्या आढळून आल्या आहेत. मुख्याध्यापक यांना नोटीस बजावण्याची सूचना गटशिक्षणाधिकारी यांना दिली आहे. 
- रमेश वाघ, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, बोदवड. 

शाळेत फेब्रुवारी महिन्यात शालेय पोषण आहार आला होता. त्यात एक-दोन कट्टा खराब झालेला असेल, तो माल आज वाटला गेला. पुरवठादारांना तांदूळ बदलून देण्याविषयी सांगितले असून, पुरवठादारांनी तांदूळ बदलून दिलेला आहे. 
- आर. जे. बडगुजर, मुख्याध्यापक, रां. का. हायस्कूल, बोडवड. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Boddaval The larvae a nutritional diet