बिबट्या आला रे आला नव्हे...लांडगा आला 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

या शेतात झालेला हल्ला हा बिबट्याचा नसून हिंस्र प्राण्याने केलेला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये तारेचे कुंपण करून गुरांना बांधावे. जेणेकरून ते अशा हल्ल्यांपासून सुरक्षित राहतील. झालेल्या नुकसानीची मदत लवकरात लवकर देण्यात येईल. 
- धनंजय पवार, वन परिक्षेत्र अधिकारी, चाळीसगाव 

मेहुणबारे (ता. चाळीसगाव), ता. ११ : शेतात बांधलेल्या सुमारे पन्नास शेळ्यांवर लांडग्याने हल्ला करून ३६ शेळ्यांचा फडशा पाडल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास शहरातील करगाव रस्त्यावरील शेतात घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. सुरुवातीला हा हल्ला बिबट्याने केल्याचा संशय व्यक्त होत होता. मात्र, मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे यांच्यासह वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी गेल्यानंतर त्यांनी हा हल्ला लांडग्याने केल्याचे सांगितले. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. 
शहरातील नेताजी पालकर चौकातील रहिवासी बाळासाहेब पवार यांची करगाव रस्त्यावरील धुळे रेल्वे लाइनजवळ शेती आहे. शेतात त्यांनी शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केलेला असून, त्यांच्याकडे जवळपास पन्नासच्या आसपास शेळ्या आहेत. आज पहाटे तीनच्या सुमारास लांडग्याने या शेळ्यांवर हल्ला करून लहान मोठ्या अशा तब्बल ३६ शेळ्यांचा फडशा पाडला. या हल्ल्यात पाच शेळ्या जखमी झाल्या आहेत. ही घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर शेळ्यांना बिबट्याने ठार केल्याची अफवा सर्वत्र पसरली. या घटनेची माहिती वन विभागाला कळविल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी धनंजय पवार, मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, प्रकाश पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मेहूल राठोड आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. जखमी शेळ्यांवर उपचार करून घटनेचा पंचनामा करण्यात आला. शेतकरी बाळासाहेब पवार यांना वन विभागाकडून नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. पवार यांनी दिले. यावेळी सागर पवार, बबडी शेख, अरुण पाटील, प्रशांत पवार, हेमंत बोरसे, अजिंक्य चौधरी, नीलेश चौधरी, सचिन पवार, शुभम पाटील आदी उपस्थित होते.

नक्‍की पहा > नशेचे द्रावण पाजून चौघांकडून युवतीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न 

बिबट्याची अफवा 
यापूर्वी करगाव (ता. चाळीसगाव) शिवारात बिबट्याने गुरांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या हल्ल्याच्या घटनेमुळे बिबट्याच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. तीन- चार वर्षांपासून बिबट्यांनी तालुक्यात अक्षरशः भीती निर्माण केली होती. विशेषतः गिरणा पट्ट्यात बिबट्याची प्रचंड दहशत पसरली होती. नरभक्षक बिबट्याने सात जणांचा बळी घेतला होता. वन विभागाने या बिबट्याला गोळ्या घालून ठार केले होते. मात्र, त्यानंतरही बिबट्याचे भय संपले नव्हते. उंबरखेड, मेहुणबारे, लांबे वडगाव, पिंपरखेड शिवारात बिबट्याचे हल्ले सुरुच होते. अनेक शेळ्या, मेंढ्या, वासरांचा बिबट्याकडून फडसा पाडला जात होता. वन विभागाने दोन बिबट्यांना सापळा लावून पकडले होते. त्यामुळे तालुक्यात बिबट्याच्या भयापासून ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला होता. मात्र, करगाव शिवारात आज तब्बल ३६ शेळ्या ठार झाल्याची घटना घडल्याने पुन्हा बिबट्या चर्चेत आला आहे. मात्र, हा हल्ला बिबट्याचा नसून लांडग्याने केला असल्याचे मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे यांनी ‘सकाळ’ला सांगितले. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon fox attack goat mehunbare