पोलिसांनी केलेल्या सहकार्यामुळे मजुरांचे डोळे पाणावले

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 April 2020

या सर्व मजुरांची माहिती आम्ही घेतली असून याबाबत महसूल विभागाला कळविले आहे. या सर्वांची येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. त्यानंतर महसूल विभागाच्या आदेशानुसार पुढील व्यवस्था केली जाईल. 
- सचिन बेंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, मेहुणबारे (ता. चाळीसगाव) 

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : संसाराला हातभार लागावा म्हणून मध्यप्रदेशातून मराठवाड्यात शेती कामासाठी गेलेले मजूर आपली स्वतःची शेती तयार करण्यासाठी घराकडे वाट तुडवत निघालेले आहेत. सुमारे ४० जणांचा लोंढा कन्नडचा घाट पार करून चाळीसगावमार्गे मार्गक्रमण करीत आहे. मेहूणबारेकडे हे मजूर पायी येत असल्याची माहिती येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांना समजताच त्यांनी या सर्व गोरगरीब मजुरांना सावलीत एका थांबवले व सर्वांना विविध फळे, बिस्किटांचे वाटप करून त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था करून दिली. पोलिसांनी केलेली ही मदत पाहून बऱ्याच मजुरांच्या डोळ्यांत पाणी आले होते. 

सेंधवा (जि. बडवानी, मध्यप्रदेश) तालुक्यातील जलेलाबाद येथील हे आदिवासी मजूर असून ते औरंगाबाद जिल्ह्यातील हतनूर येथे गेल्या काही महिन्यांपासून आद्रक काढणीच्या कामासाठी गेलेले होते. हे काम संपल्याने ‘लॉकडाऊन’ सुरू झाल्यामुळे सर्व आदिवासी कुटुंबाची परवड होत आहे. पावसाळ्याचे दिवस जवळ आपल्या घरची शेतीची कामे करण्यासाठी आदिवासी मजूर आपल्या घराकडे जाण्यासाठी धडपड करीत आहेत. सध्या कुठल्याही वाहनाची सोय नसल्याने हातावर पोट असलेल्या या मजुरांनी पायी जाण्याचा निर्णय घेतला असून ते कन्नडमार्गे आज सकाळी मेहुणबारेत दाखल झाले. लहान मुले, वृद्ध, महिला असा सुमारे ४० जण दोन दिवसांपासून पायी निघाले आहेत. 

क्‍लिक कराः चाळीसगावचे सर्व कोरोन संशयीतांचे अहवाल निगेटिव्ह 
 

पोलिसांकडून मदत 
हे मजूर मेहूणबारेत येत असतानाच चाळीसगावचे तहसीलदार अमोल मोरे यांना कळविण्यात आले. मात्र, त्याची कुठलीही दखल घेतली नाही. अखेर मेहुणबारे पोलिसांना हे समजताच पोलिसांनी त्यांना हॉटेल वर्षाजवळ सावलीत सर्वांना थांबवले. या मजुरांपैकी अनेकांच्या पोटात अन्नाचा कण देखील नव्हता. अशा स्थितीतही ते अंग भाजून काढणाऱ्या उन्हात रस्ता कापत होते. त्यांची ही अवस्था पाहून येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी तातडीने उपनिरीक्षक हेमंत शिंदे, हवालदार योगेश मांडोळे, राजेंद्र निकम, प्रकाश पाटील, जयेश पवार, रवी माळी, वाल्मीक मोरे यांच्या माध्यमातून तत्काळ टरबूज, खरबूज, केळी आदी फळे तसेच लहान मुलांसाठी बिस्किटे मागवली व त्यांचे सर्वांना वाटप केले. काही वेळानंतर या ४० मजुरांच्या जेवणाची सोयही त्यांनी करून दिली. पोलिसांच्या या मदतीमुळे कामगार कुटुंबीय भारावले होते. 

नक्की वाचा :  "लॉकडाऊन' मध्ये झाली पक्षीगणना...सातशे एकोनसत्तर पक्ष्यांची नोंद 
 

रमाबाई सेनानी ः सहा महिन्यापासून आम्ही औरंगाबाद जिल्ह्यात शेती कामासाठी गेलेलो होतो. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने आम्हाला दरवर्षी दुसऱ्या जिल्ह्यात रोजगारासाठी जावे लागते. शेताची कामे संपल्याने घरी जाण्यासाठी निघालो आहोत. मात्र, वाहनाची व्यवस्थाच नसल्याने अशा परिस्थितीत शासनाने आमची घरी 

जाण्याची व्यवस्था करावी. 
दुवारसिंग सेनानी ः आम्ही शेतातील कापूस वेचणी निंदणीचे काम देखील करतो. सध्याच्या ‘लॉकडाऊन’मुळे घरी जाणे कठीण झाले आहे. पावसाळा दीड महिन्यावर येऊन ठेपला आहे. अजून आमची शेती तयार करायची बाकी आहे. त्यामुळेच काहीही करून घरी जायचे आहे. सध्या कुठलीच सोय नसल्याने पायपीट करून घरी जात आहोत
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon Madhya Pradesh police hunger for laborers