मोटार वाहन निरीक्षकांची सीमांवर गैरहजेरी 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 May 2020

आमचा विभाग म्हणजे काही पोलिस विभाग नाही. आमच्याकडे सर्व अधिकारी असून संख्याबळ कमी आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी ड्यूटी लावता येत नाही. राज्यात जळगावच्या ‘आरटीओ’ विभागानेच सीमांवर नियुक्त्या केल्या. त्यानुसार, आठ ठिकाणी रोटेशन पद्धतीने आमचे मोटार वाहन निरीक्षक तैनात होते. प्रत्येकाने ज्याची त्याची जबाबदारी पार पाडली आहे. 

-शाम लोही, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव 

तरवाडे (ता. चाळीसगाव) ः कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी जळगावच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी जिल्ह्यांच्या विविध सीमांवर मोटार वाहन निरीक्षकांच्या नेमणुका केलेल्या होत्या. यापैकी काही सीमांवर ज्यांची ड्यूटी लावलेली होती, अशा मोटार वाहन निरीक्षकांची हजेरीच लावली नाही. त्यामुळे त्यांच्या कामकाजाचा अहवाल मागवून कर्तव्याच्या ठिकाणी गैरहजर राहिलेल्या संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी जळगाव येथील गणेश ढेंगे यांनी केली आहे. 

नक्की वाचा :  भुसावळमध्ये पुन्हा दोन कोरोणा पॉझिटिव्ह 
 

या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात श्री. ढेंगे यांनी नमुद केले आहे, की जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये व दर महिन्याच्या रोटेशन पद्धतीने जळगावच्या उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी एप्रिल २०२० साठी वायुवेग पथक क्रमांक एक, दोन व महसूल सुरक्षा पथकात प्रत्येकी एका मोटार वाहन निरीक्षकांची नियुक्ती केली होती. त्यांच्यावर जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या सीमांवर नाकेबंदी करून वाहन तपासणी करण्याची जबाबदारी दिलेली होती. त्यानुसार, कन्नड घाटातून औरंगाबादकडून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी देखील ‘आरटीओ’ विभागाचे एक पथक तैनात करण्यात आलेले होते.

क्‍लिक कराः उन्हातान्हात लाठी खात मिळवली बाटली ;तळीरामांनी लावल्या लांबच लांब रांगा 

प्रत्यक्षात या ठिकाणी ज्यांची ड्यूटी लावलेली होती, अशा संबंधित मोटार वाहन निरीक्षकांनी एक दिवसही हजेरी लावली नाही. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘आरटीओ’ विभागाकडून वाहनांची जी तपासणी झाली पाहिजे, ती होऊ शकली नाही. अशीच परिस्थिती जिल्ह्यातील इतरही काही भागात होती. त्यामुळे वायुवेग पथकाद्वारे रीतसर व आदेशानुसार, वाहनांची तपासणी करण्याकडे दुर्लक्ष झाले. या दुर्लक्षामुळे ‘लॉकडाउन’च्या काळातही अवैध प्रवासी वाहतूक, वाळूची विना परवाना वाहतूक तसेच विनाकारण फिरणारे वाहनचालक बिनधास्तपणे मोकळे फिरत होते. ज्यामुळे कोरोनाच्या संदर्भात जी काळजी ‘आरटीओ’ विभागाकडून घेतली जाणे अपेक्षित होती, ती घेतली गेली नाही. जळगाव- भुसावळ महामार्गावरील कालीका माता मंदिरासमोर भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनामुळे अपघात होऊन महिलेला जीव गमवावा लागला होता. पोलीस आणि महसूल प्रशासनाकडून कोरोनाच्या संदर्भात ज्या उपाययोजना केल्या जात होत्या, तशा ‘आरटीओ’ विभागाकडून केल्या गेल्या नाहीत. त्याला या विभागातील काही अधिकारी जबाबदार आहेत. त्यामुळे ज्या- ज्या मोटार वाहन निरीक्षकांनी त्यांना नेमून दिलेल्या कामात कुचराई केली असेल, अशांची चौकशी करावी. विशेषतः एप्रिल महिन्यात त्यांनी केलेल्या कामकाजाचा अहवाल मागवावा व कर्तव्यात कसूर करून नेमून दिलेल्या ठिकाणी गैरहजर राहणाऱ्या संबंधित मोटार वाहन निरीक्षकांच्या विरोधात तसेच त्यांना सहकार्य करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी गणेश ढेंगे यांनी केली आहे. 

आर्वजून पहा : रईसजाद्यांना मद्याची खरेदी भोवली ;29 लाखांची गाडीत 37 हजारांची दारु जप्त 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon motor vehicle inspectors border cheking Absence