चाळीसगावात होतोय ‘नॅनो रिव्हर लिंक पूल’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 मार्च 2020

चाळीसगावातील तितूर व डोंगरी नदी संगम तसेच मस्तानी अम्मा टेकडी परिसराचे सुशोभीकरण करण्याच्या प्रस्तावात हा पूल साकारला जात आहे. या कामासाठी पर्यटन विभागातर्फे ४ कोटी ९२ लाख मंजूर करण्यात झाले आहेत. संपूर्ण काम झाल्यानंतर शहरातील नदीपात्र आणि हा पूल शहराच्या वैभवात भर घालणारा ठरेल. 
- उन्मेष पाटील, खासदार 

चाळीसगाव : शहरातील शिवाजी घाटातून स्वामिनारायण मंदिराजवळून आ. बं. हायस्कूलकडे जाणाऱ्या रस्त्यावर नदीचे पात्र असल्याने या ठिकाणी खासदार उन्मेष पाटील यांच्या प्रयत्नातून ‘नॅनो रिव्हर लिंक पूल’ साकारला जात आहे. या पुलाच्या कामाची खासदार उन्मेष पाटील यांनी नुकतीच पाहणी केली. हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठी सोय होणार आहे. 

हेपण पहा -चुलत बहिणीने फुलवले भावाच्या जीवनाचे पुष्प 

कधीकाळी अगदी पाटणादेवी रस्त्यापासून रांजणगाव दरवाजातून सदर बाजारामार्गे शिवाजी घाटातून स्वामी नारायण मंदिरावरून आ. बं. हायस्कूलमध्ये हजारो नागरिक विद्यार्थी नदीपात्रातून ये जा करायचे. शहरातून खळखळ वाहणारी तितूर व डोंगरी नदी चाळीसगावच्या विकासात भर घालणारी ठरली होती. या नदीपात्रात गावातील गुराढोरांच्या पाण्यासह धुणे धुण्यासाठी महिलांना सोयीचे होत होते. कालांतराने वस्ती वाढल्यानंतर तसेच शहरातील घाण नदीपात्रात आणून फेकणाऱ्यांचे प्रमाण वाढल्यानंतर वाढत्या अतिक्रमणांनी नदीचे पात्र अरुंद होत गेले. पर्यायाने नदीतून वाहणारे पाणी थांबले व संपूर्ण नदीपात्र अस्वच्छ झाले. या घाण पाण्यातून पायी जाण्याचा मार्गही बंद झाला. आता या नदीपात्रातून पुन्हा पलीकडे जाण्याचा मार्ग निर्माण केला जाऊ शकतो, हा विचार आजपर्यंत झालेल्या एकाही लोकप्रतिनिधीच्या मनाला शिवला नाही. तत्कालीन आमदार व विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांना मात्र वेगळीच कल्पना सुचली. 

क्‍लिक करा -पुजेसाठी मागितला कोंबडा...यानंतर पुजाऱ्याने गमावला जीव
 

पुलाच्या कामाला सुरुवात 
या नदीपात्रातून इकडून तिकडे येण्यासाठी मुंबईत जसा ‘सी लिंक’ पूल आहे, तसा पूल उभारला जाऊ शकतो, या विचाराला त्यांनी प्रत्यक्षात उतरवले. या ‘नॅनो रिव्हर लिंक’ पूलाचे काम अखेर सुरू झाले. लवकरच हा पूल प्रत्यक्षात वापराला येणार आहे. या पुलाची खासदार उन्मेश पाटील यांनी नुकतीच पाहणी केली. त्यांच्या प्रयत्नातून साकारल्या जाणाऱ्या पुलामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळणार असल्याने परिसरातील नागरिकांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत. सद्यःस्थितीत पुलाचे काम पूर्णत्वास आले आहे. खासदारांनी केलेल्या या पाहणीप्रसंगी नगरसेवक मानसिंग राजपूत, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, नगरसेवक गणेश महाले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भाऊसाहेब जाधव, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र जैन, मल्हार सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख गणेश जाने, भरत गोरे, कैलास गावडे, अमित सुराणा, शेषराव चव्हाण, रवी राजपूत आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 
 
शहरातील पर्यटनाला मिळणार चालना 
चाळीसगाव तालुक्याला ऐतिहासिक, आध्यात्मिक व निसर्ग सौंदर्याचा वारसा लाभला आहे. तालुक्याला धुळे, नाशिक, औरंगाबाद हे जिल्हे लागून आहेत. त्यामुळे पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. बामोशी बाबा दर्गा व मस्तानी अम्मा टेकडी दर्गा परिसराचा आजपर्यंत विकास झालेला नव्हता. शहरातील नदीला तर कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे नदी तटाच्या परिसराभोवती नदी घाट, वनोद्यान, संरक्षण भिंत व मूलभूत सुविधा निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. उन्मेश पाटील यांनी आपल्या आमदारकीच्या काळात तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे पाठपुरावा करुन हे काम मंजूर केले होते. ज्यातून नदी घाट, वनोद्यान, संरक्षण भिंत, पथदिवे व मूलभूत सुविधांची कामे होणार आहेत. ज्यामुळे अनेकांना रोजगार मिळून शहरातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon nano fiver link brige mp unmesh patil