चार दिवसात 643 जण चाळीसगाव तालुक्‍यात; सारेजण क्‍वारंटाईन

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 May 2020

परराज्यातून वा  परजिल्ह्यातून आले आहेत.चाळीसगाव सीमेवर पोलीसांनी व  तसेच आरोग्य पथकाकडून वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या हातावर शिक्का मारून 14 दिवस होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात, जिल्ह्यात जाण्यासाठी केंद्र शासनाने अटी शर्तीवर परवानगी दिली आहे. त्यानुसार आता राज्य शासनानेही अडकलेल्या नागरिकांना बाहेरील राज्यातून, जिल्ह्यातून त्यांच्या राज्यात जाण्याची परवानगी दिल्याने परराज्य,व जिल्ह्यात अडकून पडलेल्या नागरिकांनी दिलासा मिळाला आहे.चाळीसगाव तालुक्यात 1 मे ते आज 4 मे पर्यंत सुमारे 643 नागरीक परराज्यातून वा  परजिल्ह्यातून आले आहेत.चाळीसगाव सीमेवर पोलीसांनी व  तसेच आरोग्य पथकाकडून वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या हातावर शिक्का मारून 14 दिवस होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

चाळीसगावपासून अवघ्या 55 किमी अंतरावर असलेल्या धुळे, मालेगाव व पाचोरा येथे कोरोबाधीत रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे चाळीसगाव तालुक्याच्या सीमा सील करण्यात आल्या असून पर जिल्ह्यातील कुठल्याही व्यक्तीला तालुक्यात प्रवेश करू दिला जात नाही. तालुक्यात धुळे रस्त्यावर तरवाडे बारी, मालेगाव रस्त्यावर साकुर फाटा, नांदगाव रस्त्यावर रोहीणी तर नागद रस्त्यावर जामडी व कन्नड रस्त्यावर कन्नड घाट अशा पाच ठिकाणी तपासणी नाके आहेत. या ठिकाणी पोलीस दलासह आरोग्य विभागाचे पथक तळ ठोकून आहे.  
 
लॉकडाउनमुळे अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, इतर नागरिकांना त्यांच्या इच्छितस्थळी जाण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार ज्या नागरिकांना परराज्यातून अथवा इतर जिल्ह्यांतून जळगाव जिल्ह्यात यायचे व जायचे असेल त्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार तालुक्यात 1 ते 4 मे पर्यंत सुमारे 643 जण आले आहेत. तालुक्यातील पाचही तपासणी नाक्यांवर या नागरीकांची पोलीसांनी चौकशी करून त्यांच्याकडील कागदपत्रानुसार त्यांची आरोग्य पथकामार्फत वैद्यकीय तपासणी केली जाते. या वैद्यकीय तपासणीत कोरोना सदृश्य लक्षणे आढळली तर त्यांना पुढील उपचारासाठी चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात पाठवले जाते. लक्षणे नसलेल्या नागरीकांना चाळीसगाव हद्दीत आल्यानंतर त्यांच्या हातावर शिक्का मारून 14 दिवस होम क्वारंटाईन केले जात आहे. 

कठोर कारवाईचा इशारा
तालुक्याच्या सीमेवर असलेल्या चेक पोस्टवरील वैद्यकीय पथकातील अधिकाऱ्यांनी  वैद्यकीय प्रमाणपत्र व अधिकृत पास असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश द्यावा व त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारवेत असे निर्देश तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले आहेत. याबाबत हलगर्जीपणा झाल्यास कठोर कारवाईचा इशारा ही  संबंधीत वैद्यकीय पथकाला देण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon taluka four days 643 people entry