esakal | दोन महिन्यांपासून ती होती बेपत्ता...पुन्हा चुकली रस्ता 
sakal

बोलून बातमी शोधा

women missing

महिला सुमारे दोन महिन्यांपासून आपल्या अडीच वर्षांच्या मुलीसह घरातून बेपत्ता झाली होती. याबाबत तिच्या पतीने आंबेगाव पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद केली होती. दरम्यान, मीना पोखरकर ही महिला चुकून चाळीसगावच्या खरजई नाक्यावर आली. 

दोन महिन्यांपासून ती होती बेपत्ता...पुन्हा चुकली रस्ता 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तरवाडे (ता. चाळीसगाव) : सुमारे दोन महिन्यांपासून बेपत्ता झालेली २५ वर्षीय विवाहिता येथील ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे तिच्या कुटुंबीयांना परत मिळाली. या घटनेत गावातील पोलिस पाटलांसह रिक्षाचालक तसेच तरुणांचे सहकार्य मोलाचे ठरले. 
मीना अंकुश पोखरकर (वय २५, रा. खडकी, ता. आंबेगाव, जि. पुणे) ही महिला सुमारे दोन महिन्यांपासून आपल्या अडीच वर्षांच्या मुलीसह घरातून बेपत्ता झाली होती. याबाबत तिच्या पतीने आंबेगाव पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद केली होती. दरम्यान, मीना पोखरकर ही महिला चुकून चाळीसगावच्या खरजई नाक्यावर आली. 

नक्‍की वाचा - देवा काय पाप केले रे माझ्या काळजाच्या तुकड्यांनी...आईचा आक्रोशाने हजारोंच्या डोळ्यात पाणी

कोठे जायचे सांगता येईना 
तरवाडे येथे जाणाऱ्या रिक्षात ती बसली. रिक्षाचालक सतीश गायकवाड यांनी तिला विचारले असता, तिने तरवाडे येथेच जायचे असल्याचे सांगितले. काल (२४ फेब्रुवारी) सायंकाळी ही महिला मुलीसह तरवाडेत आल्यानंतर तिला नेमके कोणाकडे जायचे हे सांगता येत नव्हते. रिक्षाचालक गायकवाड यांनी तिला काकांच्या घरी नेऊन जेवू घातले व या महिलेबाबत त्यांनी काही ग्रामस्थांना सांगितले. काही वेळातच पोलीस पाटील जीवन पाटील यांनी ही माहिती समजल्यानंतर ते गायकवाड यांच्या घरी आले. 

हेपण पहा - मधमाशांनी रोखला अंत्यविधी...शेवटी बोलाविले जेसीबी

तिचा होता प्रेमविवाह
महिला घाबरलेल्या अवस्थेत असल्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देत होती. काही वेळानंतर तिची विचारपूस केल्यानंतर ती सिल्लोड तालुक्यातील असल्याचे समजले. या आधारावर पोलिस पाटील जीवन पाटील यांनी तिचा संपूर्ण तपास केला असता, तिने पाच वर्षांपूर्वी अंकुश नामक युवकाशी प्रेमविवाह केलेला होता व ती रागाच्या भरात ती घरून निघून गेली होती. ही महिला केवट समाजाची असल्याचे लक्षात आल्यानंतर तिला तिची वाघळी (ता. चाळीसगाव) येथे राहणाऱ्या मावशीकडे रवाना करण्याचे ठरले. त्यानुसार, रात्री दीडच्या सुमारास पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र चौधरी, नाना दरेकर, शिवसेनेचे शाखा प्रमुख ज्ञानेश्‍वर शिंदे व पोलिस पाटील जीवन पाटील यांनी तिला तिच्या मावशीकडे सुखरुप रवाना केले. दरम्यान, महिलेच्या तपासकामी जळगाव पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र शिंदे, वाघळीच्या महिला पोलीस पाटील जयश्री बऱ्हाटे, पुणे येथील पोलीस जितेंद्र पाटील आदींचे सहकार्य लाभले. 

महिला पोलिस कर्मचाऱ्यांची मागणी 
या घटनेसंदर्भात ‘सकाळ’चे बातमीदार बापू शिंदे यांनी रात्री ग्रामीण पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना सांगितल्यानंतर त्यांनी ‘आमच्याकडे महिला पोलिस कर्मचारी नाही. त्यामुळे रात्रभर महिलेला गावात राहू द्या व सकाळी पोलिस ठाण्यात पाठवा’ असे सांगितले. हा प्रकार चाळीसगाव तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सोनल साळुंखे यांना समजल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात महिला कर्मचारी नसल्याने नाराजी व्यक्त केली. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न सध्या ऐरणीवर असताना याबाबत आपण गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तक्रार करणार असल्याने सौ. साळुंखे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 

loading image
go to top