देवा काय पाप केले रे माझ्या काळजाच्या तुकड्यांनी...आईचा आक्रोशाने हजारोंच्या डोळ्यात पाणी 

mother crying
mother crying

सोनगीर : 'उठा ना रे बाळांनो, शाळेची वेळ झाली. परमेश्वरा कुठे डोळे लावून बसलास रे? काय पाप केले रे देवा माझ्या काळजाच्या तुकड्यांनी? माझी मुले नाहीत; तर मला तरी का जिवंत ठेवलेस रे? काय करू, कुठे जाऊ, कसे जगू?' असा टाहो दोन्ही मुले गमावून बसलेल्या एका आईचा टाहो ह्रदयाला चिरुन जात होता. उपस्थित हजारो ग्रामस्थांचे डोळे पाणावले. महिलावर्गाचे अश्रू थांबत नव्हते. 

रडून रडून अश्रूही संपले 
गौरव व दोन्ही दीपक हे तीन जण दुपारी साडेतीनच्या सुमारास गावाजवळील स्वतःच्या शेतात चारा घेण्यासाठी सायकलवर गेले होते. सायंकाळी सहा वाजून गेले तरी ते परत न आल्याने लिलाधर जाधव व काही जण शेतात गेले. त्यांनी विहीरीत डोकावले असता पाण्यात चप्पल तरंगताना दिसून आले. मनोहर पाटील व नितीन पाटील यांनी विहीरीत उडी घेतली. त्यांनी एक एक करीत तिघांना बाहेर काढले. तिघांचे मृतदेह पाहताच मुलांच्या दोन्ही मातांनी जीव निघेल एवढे मोठ्या आवाजात रूदन केले. चिमठावळ (ता. शिंदखेडा) येथे पाण्यात बुडून मृत पावलेल्या भावडांची आई सविता लिलाधर जाधव हिचे दोन्ही मुले व अलका ज्ञानेश्वर जाधव हिचा एकुलता एक मुलगा मयत झाले. मुले गेल्याच्या दुःखाने रडून रडून त्यांचे अश्रू संपले. रात्रीत दोनदा डॉक्‍टरांना बोलवून सविताबाईंना इंजेक्‍शन द्यावे लागले. गावाजवळील लहान मुलांच्या स्मशानभूमीत दफन करण्यात आले. 

संपुर्ण गाव राहिले उपाशी 
संपूर्ण गाव सुन्न झाले. गावात रात्री चूल तर पेटली नाहीच पण अंत्यसंस्कार होईस्तोवर अवघे गाव उपाशी होते. गौरव हा अकरावीला विज्ञान शाखेत येथील एन.जी.बागूल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शिकत होता. त्याचा लहान भाऊ दीपक सहावीचा विद्यार्थी होता. चुलतभाऊ दीपक हा सोंडले आश्रमशाळेत नववीत शिकत होता. तिघांच्या मित्रांना माहिती मिळताच धक्का बसला. चिमठावळसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

ग्रामस्थांचेही डोळे पाणावले 
दोन्ही मुले गमावून बसलेल्या एका आईचा टाहो हृदयाला चिरून जात होता. उपस्थित हजारो ग्रामस्थांचे डोळे पाणावले. महिलावर्गाचे अश्रू थांबत नव्हते. सविता लीलाधर जाधव हिचे दोन्ही मुले व अलका ज्ञानेश्वर जाधव हिचा एकुलता मुलगा मयत झाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com