केळीला हेक्टरी ३३ हजार फळपीक संरक्षित विमा मंजूर   

सुनील पाटील 
बुधवार, 13 मे 2020

पीक विम्याचा लाभ मिळणार आहे. तसेच सतत पाच दिवस ४५ अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान राहिल्यास केळी उत्पादकांना हेक्टरी ४१ हजार रुपये फळपीक संरक्षित विमा रक्कम मंजूर केले जाते.

चोपडा :  जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यातील महसूल भाग मंडळात एप्रिल महिन्यात सतत पाच ते सात दिवस ४२ सेल्सिअंशपेक्षा जास्त अर्थात ४४.५ सेल्सिअंशपर्यंत उष्ण तापमानाची नोंद महावेधच्या हवामानमापक यंत्रावर झाली असल्याने फळपीक विमा योजनेअंतर्गत विमा कंपनीकडून जिल्ह्यातील ५३ हजार ४८१ हेक्टर क्षेत्रावरील ४१ हजार ८५६ शेतकऱ्यांनी केळीचा पीक विमा काढलेला असून त्यांना लाभ मिळणार आहे. 

एप्रिल अथवा मे महिन्यात सतत पाच दिवस ४२ अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान राहिल्यास केळी उत्पादकांना हेक्टरी ३३ हजार रुपये फळपीक संरक्षित विमा रक्कम मंजूर केले जाते. या अनुषंगाने जिल्ह्यातील बहुतेक महसूल मंडळांचे एप्रिल महिन्यातील तापमान ४२ अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असल्याची माहिती महावेधच्या हवामानमापक यंत्राने जिल्हा कृषी विभागाकडे ऑनलाइन माहिती पाठविली आहे. यानुसार या निकषात बहुतेक महसूल मंडळ बसत असल्याने त्यांना याचा लाभ होणार आहे. या तापमानाची माहिती कृषी विभागास व शासनास कळविणे विमा कंपनीस बंधनकारक असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. 

आर्वजून पहा : कृषि विद्यापीठ परिक्षा नियोजन कृति आराखडा जाहिर.. अंतिम वर्षाच्या परीक्षा जूनमध्ये ! 

केळीबागा या प्रतिकूल अशा अति उष्ण तापमानात होरपळून केळी उत्पादनाची अपरिमित हानी होत असल्याने हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत प्रतिहेक्टरी ३३ हजार रुपये संरक्षित विम्याची रक्कम मंजूर केली जाते. सद्यःस्थितीतील एप्रिल २०२० व मे २०२० महिन्यात सतत पाच दिवस ४२ अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे पीक विम्याचा लाभ मिळणार आहे. तसेच सतत पाच दिवस ४५ अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान राहिल्यास केळी उत्पादकांना हेक्टरी ४१ हजार रुपये फळपीक संरक्षित विमा रक्कम मंजूर केले जाते. यात काही मंडळे येण्याची शक्यता आहे. 

नक्की वाचा : जळगावात पून्हा सहा कोरोना बाधित रूग्णांचे पॉझीटिव्ह रिपोर्ट 
 

तालुकानिहाय केळी उत्पादक व क्षेत्र 
जिल्ह्यातील २०१९-२० मध्ये केळी पीक विमा काढलेले तालुकानिहाय केळी उत्पादक शेतकरी तर कंसात क्षेत्र हेक्टरमध्ये पुढीलप्रमाणे ः अमळनेर- १५९ (१९४.५०), भडगाव- ७८९ (९५२.६९), भुसावळ- ५९५ (८१८.७५), बोदवड- ५० (१२०.७४), पाचोरा- ४५६ (७१६.६७), रावेर-१४६०९ (१७५७७.३८), चाळीसगाव- २२७ (३०४.७५), चोपडा- ६३७७ (८६६४.३६), धरणगाव - ८९१ (१०७१.५९), एरंडोल- ४१७ (६९२.२१), मुक्ताईनगर- ४३०३ (५८५१.८४), पारोळा - ७२ (१३३.२१), यावल- ७५३० (९६७१.५४), जळगाव - ३९३९ (४५१९.३२), जामनेर- १४४२ (२१९२.३४) असे एकूण ४१ हजार ८५६ केळी उत्पादकांच्या ५३ हजार ४८१ हेक्टर क्षेत्रावरील केळी पीक विम्याचा लाभ होणार आहे. यात सर्वाधिक रावेर, यावल, चोपडा तर सर्वांत कमी बोदवडला लाभ होणार आहे. 

क्‍लिक कराः तापीचा किनाऱ्यावर झाला अनोखा विवाह...गावभर चर्चा मात्र नवरदेव, नवरीच्या उंचीची ! 
 

चोपड्यांतील सातही मंडळात लाभ 
चोपडा तालुक्यातील चहार्डी, चोपडा, अडावद, धानोरा, गोरगावले, हातेड, लासुर या सातही महसूल मंडळातील केळी उत्पादक शेतकरी या निकषात बसत असल्याने या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी ३३ हजार रुपये प्रमाणे केळी पीक विम्याचा लाभ मिळणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chopada banana hectare 33 thousand of fruit crop insurance protected for banana