मुख्यमंत्री येता घरा : गुजरातला वाहून जाणारे पाणी "गिरणा'त आणण्याची गरज 

girna dam
girna dam

जळगाव : जिल्ह्यात सिंचनक्षमतेत अद्याप मोठी तूट आहे. सिंचन प्रकल्प अद्याप अपूर्ण आहेत; तर तापी नदीतून गुजरातला खानदेशच्या वाट्याचे 20 टीएमसी पाणी वाहून जात आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर जमीन अद्याप ओलिताखाली आलेली नाही. याशिवाय पाऊस कमी झाल्यास या भागास टंचाईचा प्रश्‍न निर्माण होतो. त्यामुळे या जिल्ह्याचा सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी अपूर्ण असलेल्या प्रकल्पांना गती देऊन मार्गी लावण्याची गरज आहे. शिवाय, "नद्याजोड' प्रकल्पांतर्गत "पश्‍चिम वाहिनी' नद्यांतून वाहून जाणारे पाणी "गिरणा'त आणण्यासाठी "नदीजोड' प्रकल्पास मंजुरी मिळाली आहे, तो तातडीने अमलात आणण्याची गरज आहे. 


जिल्ह्यात खानदेशच्या सिंचनाची क्षमता वाढविण्यासाठी 1999 मध्ये तापी खोरे विकास महामंमडळ स्थापन करण्यात आले होते. त्याअंतर्गत जिल्ह्यात सिंचनाच्या प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्याला फारशी गती मिळाली नाही. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील प्रकल्पाची कामे सुरू आहेत; परंतु त्यांना गती नाही. मुख्यत: निम्न तापी प्रकल्प, भागपूर प्रकल्पाची कामे संथ गतीने सुरू आहेत. जिल्ह्यातील प्रकल्पांत "वाघूर'चे काम 90 टक्के झाले आहे. त्याच्या डाव्या व उजव्या कालव्याचे काम शंभर टक्के झाले आहे. डाव्या कालव्यावरील लघुवितरिकांचे काम 90 टक्के झाले आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याच्या कामाला गती दिल्यास या प्रकल्पामुळे सिंचनाची निर्मितीक्षमता 55 हजार 971 हेक्‍टर होईल. मार्च 2021 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल; परंतु त्यासाठी शासनाने निधी कमी पडणार नाही, याचे नियोजन करण्याची गरज आहे. 
शेळगाव बॅरेजचे कामही अंतिम टप्प्यात आहे. सद्यःस्थितीत या धरणाचे 78 टक्के काम झाले आहे. तसेच वक्राकार दरवाजाच्या निर्मितीचे व उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे हे काम पूर्ण झाल्यास जून 2020 अखेर त्यात जलसाठा करणे शक्‍य होणार आहे. 80 हेक्‍टर निर्मित सिंचनक्षमता निर्माण होणार आहे. हा प्रकल्प बळिराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत सामाविष्ट आहे. त्यामुळे त्याला अर्थसहाय्य उपलब्ध आहे. तो पूर्ण होण्यासाठी आवश्‍यक निधीची कमतरता पडणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज आहे. याशिवाय, बोदवड उपसा सिंचन योजना, वरणगाव- तळवेल परिसर सिंचन योजना, कुऱ्हा- वढोदा उपसा सिंचन योजना, गूळ मध्यम प्रकल्प व मंगरूळ मध्यम प्रकल्प, वरखेडे- लोंढे बॅरेज, तसेच महत्त्वाचे म्हणजे अमळनेर तालुक्‍यातील निम्न तापी अर्थात पाडळसरे प्रकल्प पूर्ण झाल्यास अमळनेर, चोपडा तसेच परिसरातील सिंचनक्षमता वाढण्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही सुटणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हे प्रकल्प गतीने पूर्ण होण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 
 
"नदीजोड' राबवून "गिरणा'त पाणी आणावे 
"पश्‍चिम वाहिनी' नद्यांमधून गुजरातच्या समुद्रात मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. या नद्यांतील पाणी गिरणा नदीत वळविण्यासाठी "नदीजोड' प्रकल्प राबविण्यात येत आहे. यासाठी आराखडाही केंद्राकडे सादर करण्यात आला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. "औरंगा', "नारपार', "अंबिका' या पश्‍चिम वाहिन्या नद्यांतून गुजरातला वाहून जाणारे 20 टीएमसी पाणी "नदीजोड' प्रकल्पांतर्गत नाशिकजवळील चणकापूर धरणात सोडून ते गिरणा नदीत आणता येणार आहे. यासाठी तापी पाटबंधारे विभागाने प्राथमिक अहवाहलही युती शासनाच्या काळात तयार केला आहे. राष्ट्रीय जलविकास विभागातर्फेही (नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सी) त्याला मंजुरी मिळाली आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यास जिल्ह्यातील जळगाव, चाळीसगाव, पाचोऱ्यासह अनेक गावांना त्याचा फायदा होणार आहे. शिवाय, सिंचनाची तूटही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेती उत्पादन व सिंचनक्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. शासनाने लक्ष दिल्यास येत्या पाच वर्षांत जिल्ह्यातील सर्व प्रकल्प पूर्ण होऊन जिल्ह्यातील सिंचनाची असलेली तीस टक्के तूटही निश्‍चित भरून निघणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com