लॉकडाऊनमुळे चर्मकार बांधवांची उपासमार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 एप्रिल 2020

लॉकडाऊनमुळे रोजंदारीचे दुसरे साधन नसल्याने शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. रस्त्यावर बसून चप्पल बूट शिवणकाम करणाऱ्या या व्यवसायिकांना दिलासा देणे गरजेचे आहे. 

धरणगाव :  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज लॉकडाऊनला १४ दिवस पूर्ण होत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यावसायिकांचे लहान मोठी दुकाने बंद आहेत. त्यामुळे या व्यावसायिकांवर मोठे आर्थिक संकट आहे. यातच हातावर पोट भागवणारे बेरोजगार चर्मकार बांधवांचा व्यवसायही बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. अमळनेर विभागात सुमारे दोन हजार व्यावसायिक अडचणीत आहेत. 

रस्त्यावर बसून तसेच दुकानांवर, घरी चप्पल, बूट शिवणारे चर्मकार दररोजचा उदरनिर्वाह रोजच्या कमाईवर करीत असतात. अशा चर्मकार व्यवसाय करणाऱ्या नागरिकांकडे शासनाने लक्ष देऊन त्यांना आर्थिक मदत केली पाहिजे, अशी मागणी या व्यावसायिकांकडून होत आहे. धरणगाव शहरासह तालुक्यात एवढे चर्मकार व्यवसायिक आहेत. सध्या लॉक डाऊनमुळे त्यांना त्यांची दुकाने रस्त्यावर थाटता येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट कोसळले आहे. रोजंदारीवर त्यांच्या चरितार्थ भागत असल्याने गेल्या चौदा दिवसापासून हाताला काम नसल्याने उदरनिर्वाह कसा करावा ही चिंता त्यांना सतावत आहे. या लॉकडाऊनमुळे रोजंदारीचे दुसरे साधन नसल्याने शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. रस्त्यावर बसून चप्पल बूट शिवणकाम करणाऱ्या या व्यवसायिकांना दिलासा देणे गरजेचे आहे. 

क्‍लिक कराः  कोरोना इफेक्‍ट: कॉस्मेटिक उत्पादकांना कोट्यवधींचा फटका ! 
 

रोज कमवायचे अन् रोज खायचे असा आमचा हातावर पोट असलेला व्यवसाय असल्याने गेल्या १५ दिवसापासून परिवाराची दैना झाली आहे. सरकारने लॉकडाऊन करण्याआधी आमच्या सारख्या हातमजूरांची व्यवस्था लावायला हवी होती. सरकारने जाहीर केलेल्या मोफत रेशनच्या आजही प्रतीक्षेत आहोत. 
- हिरामण ओकांर बन्सी, चप्पल- बूट रिपेरिंग चर्मकार. 

या महिन्यात पालिकेने काढलेले अतिक्रमण अन्‌ नंतर कोरोनाचे संकट मारक ठरले. कोरोनामुळे सरकारने बंद जाहीर केले आहे. प्रत्येकाला आपला जीव प्रिय असल्याने सरकारच्या मोहिमेत आम्ही सहभागी झालो आहोत. मात्र, असे जर पूर्ण महिनाभर चालले तर हातमजूरी करणाऱ्या माझ्यासारख्यांनी व त्यांच्या परिवाराने खायचे काय ? 
- कैलास हिरापूरे, चप्पल रिपेरिंग कामगार. 

कोरोनाचे संकट ही एक राष्ट्रीय आपत्ती आहे. मात्र, अचानक सरकारने लॉकडाऊन केल्यामुळे हातावर पोट असलेल्या बारा बलुतेदारांचे हाल झाले आहे. सरकारने रस्त्यावर बसून पोट भरणाऱ्या गठई चर्मकारांसारखे बारा बलुतेरांची आधी पोटा- पाण्याची व्यवस्था लावणे आवश्यक होते. १५ दिवस लोटले गेले तरी सरकारने जाहीर केलेले मोफत राशन अद्याप गरीब लोकांपर्यंत न पोहोचल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याचा विचार सरकारने करून गरिबांना न्याय द्यावा. 
- शरदकुमार बन्सी, जिल्हा सल्लागार, राष्ट्रीय चर्मकार महासंघ, धरणगाव. 

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी घरीच राहणे हा एकमेव पर्याय आहे. मात्र, लॉक डाऊनमुळे चर्मकार व्यावसायिकांची उपासमार होत आहे. यासाठी समाजातील सक्षम असलेल्या बांधवांनी आपल्या व्यावसायिकांनी सहकार्य करावे. त्यांच्या परीने जेवढी शक्य होईल तेवढी आर्थिक अथवा जीवनावश्‍यक वस्तू देऊन मदत करणे गरजेचे आहे. 
-भानुदास विसावे, कार्याध्यक्ष, राष्ट्रीय चर्मकार संघ, धरणगाव.

क्‍लिक कराः "कोरोना' तपासणीसाठी डॉक्‍टरांना सुरक्षा कवच...दोन दिवसांत "मॉड्यूल' तयार  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dharngaon charmkar Society starve due to lockdown