रेमडेसिव्हिरची विक्री किंमत ११०० ते १४०० रुपयांपर्यंत 

निखील सुर्यवंशी
Wednesday, 7 April 2021

रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळा बाजार, तुटवडा जाणवत असल्यास अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करावी.​

धुळे : शासनाने राज्यात सर्वत्र रेमडेसिव्हिर इंजेक्शनची विक्री किंमत ११०० ते १४०० रुपयांपर्यंत निर्धारित केली आहे. सेवाभावातून ते आणखी कमी किमतीत दिले तर रुग्णांना दिलासा मिळू शकेल. मात्र, निर्धारित किमतीपेक्षा अधिक दराने इंजेक्शन विक्रीबाबत तक्रारी झाल्या तर संबंधितांवर गुन्हा दाखल करून त्यांचे परवाने निलंबित केले जातील, असा सज्जड इशारा सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला. 

आवश्यक वाचा- रेमडेसिव्हिरचे तीन हजार डोस मिळणार;मंत्री शिंगणेंची ग्वाही 
 

आरोग्यमंत्री टोपे धुळे दौऱ्यावर होते. त्यांना रेमडेसिव्हिरबाबत तक्रारी, काळा बाजार आणि तुटवड्याबाबत विचारणा केली असता ते ‘सकाळ’शी बोलताना म्हणाले, की राज्य शासनाने रेमडेसिव्हिरची विक्री किंमत ११०० ते १४०० रुपयांपर्यंत निर्धारित केली आहे. कुठल्याही कंपनीचे हे इंजेक्शन असले तरी त्यास शासनाने निर्धारित केलेली किंमत लागू आहे. रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळा बाजार, तुटवडा जाणवत असल्यास अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करावी. प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका, अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त पथकाद्वारे गैरविक्रीवर नियंत्रण आणावे. तसेच दोषींवर गुन्हा दाखल करावा, संबंधित विक्रेत्याचा परवाना रद्द करावा, अशी सूचना आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली.

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule action taken marketing remediver injection