अनुरागने संघर्षातून सोळाव्या वर्षी मिळवली संगीत विशारदची पदवी!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 11 February 2020

निजामपूर (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे (ता.साक्री) येथील आदर्श विद्यामंदिराचा माजी विद्यार्थी तथा धुळे येथील जयहिंद शैक्षणिक ट्रस्ट संचलित- झेड.बी.पाटील महाविद्यालयातील अकरावीचा विद्यार्थी अनुराग भगवान जगदाळेने अवघ्या सोळा वर्ष वयात मुंबईच्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या गायनातील संगीत विशारद पदवी परीक्षेत 66.37% गुण मिळवून यश संपादन केले. 

निजामपूर (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे (ता.साक्री) येथील आदर्श विद्यामंदिराचा माजी विद्यार्थी तथा धुळे येथील जयहिंद शैक्षणिक ट्रस्ट संचलित- झेड.बी.पाटील महाविद्यालयातील अकरावीचा विद्यार्थी अनुराग भगवान जगदाळेने अवघ्या सोळा वर्ष वयात मुंबईच्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या गायनातील संगीत विशारद पदवी परीक्षेत 66.37% गुण मिळवून यश संपादन केले. 

जयहिंद शैक्षणिक ट्रस्ट संचलित- झेड.बी.पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एच.पवार, उपप्राचार्य डॉ.सी.एन. पगारे, उपप्राचार्या डॉ.विद्या पाटील, उपप्राचार्या प्रा.अनिता पाटील, मराठी विभागाच्या प्रा.डॉ.योगिता पाटील, इंग्रजी विभागाच्या प्रा.डॉ.वर्षा पाटील, संगीत विभागाच्या प्रा.संगीता जगदाळे आदींनी अनुरागचे पेढे भरवून अभिनंदन केले. तर आदर्श महाविद्यालयाचे अध्यक्ष ऍड.शरदचंद्र शहा यांच्यासह संचालक मंडळातर्फे  वडिलांसह अनुरागचा विशेष सत्कार झाला.

पहिलीत असतानाच, वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी मातृछत्र हरपलेल्या अनुरागने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत वयाच्या सोळाव्या वर्षी अतिशय जिद्दीने संगीत विशारदची पदवी संपादित केली. शालेय शिक्षण सांभाळून त्याने सलग सात वर्षे ही साधना केली. गायनात प्रारंभिक, प्रवेशिका प्रथम, प्रवेशिका पूर्ण, मध्यमा प्रथम, मध्यमा पूर्ण, विशारद प्रथम, विशारद पूर्ण अशा सात परीक्षा तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. गेली तीन ते चार वर्षे त्याने शाळा सांभाळून निजामपूर ते नंदुरबार ये-जा करत संघर्षातून गायनाचे शिक्षण घेतले. दहावीतही त्याने 76टक्के गुण मिळवून यश संपादन केले होते.

अनुरागने सारेगमप, संगीत सम्राटच्या ऑडिशनसह जिल्हास्तरीय, विभागस्तरीय युवा महोत्सव, कला महोत्सव व चेतक फेस्टिव्हलसह विविध गायन स्पर्धांमध्येही यशस्वी सहभाग नोंदवला आहे. "आगामी काळात गायनासह संगीत क्षेत्रात करिअर करायचं आहे", अशी प्रतिक्रिया अनुरागने 'सकाळ'शी बोलताना दिली. अनुराग जगदाळे हा येथील आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील इंग्रजीचे शिक्षक प्रा.भगवान बापूजी जगदाळे यांचा लहान मुलगा आहे. अनुरागला नंदुरबार येथील सुरसिंगार संगीत विद्यालयाच्या संचालिका तथा संगीतगुरू पं.नलिनीबुवा रोकडे, गोविंदबुवा रोकडे, दीपालीबुवा रोकडे, सारंगबुवा रोकडे, राकेश खैरनार आदींचे मार्गदर्शन लाभले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule anurag jagdale music deegre on 16 year