esakal | धुळे शहर कोरोनामुक्तीसाठी रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट केंद्रे सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

धुळे शहर कोरोनामुक्तीसाठी रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट केंद्रे सुरू

ॲन्टिजेन टेस्ट केंद्रात अवघ्या दोन मिनिटांत स्वॅब घेऊन संबंधित व्यक्ती पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह, हे समजू शकणार आहे.

धुळे शहर कोरोनामुक्तीसाठी रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट केंद्रे सुरू

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे ः कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना केल्या. त्याला नागरिकांचाही प्रतिसाद मिळाल्याने शहरात कोरोना नियंत्रणात येत आहे. यापुढील काळात धुळे शहरातून कोरोनाच्या उच्चाटनासाठी प्रयत्न आहेत. दिवाळीत बाजारात गर्दी होत असून, संसर्गाचा धोका टाळण्याच्या अनुषंगाने शहरात पाच ठिकाणी तात्पुरती रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट केंद्रे सुरू केली आहेत. या ठिकाणी नागरिकांनी नमुने तपासणीसाठी पुढे यावे, असे आवाहन महापौर चंद्रकांत सोनार यांनी केले. 

वाचा- कोरोनायोद्ध्यांनी सामाजिक दातृत्वाचे दर्शन घडविले- मंत्री पाटील - 

मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांच्या कोरोना टेस्टसाठी महापालिकेने शहरात पाच ठिकाणी रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट केंद्रे सुरू केली. महात्मा गांधी पुतळ्याजवळील एका केंद्राचे महापौर सोनार, स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, आयुक्त अजीज शेख यांच्या उपस्थितीत उद्‌घाटन झाले. नगरसेवक देवेंद्र सोनार, आरोग्याधिकारी डॉ. महेश मोर आदी उपस्थित होते. 


महापौर सोनार म्हणाले, की आयुक्त शेख, सभापती बैसाणे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे धुळे शहरात कोरोनावर आपण नियंत्रण मिळवू शकलो. भविष्यात कोरोनाचा शंभर टक्के नायनाट करण्यासाठी आता प्रयत्न आहेत. ॲन्टिजेन टेस्ट केंद्रात अवघ्या दोन मिनिटांत स्वॅब घेऊन संबंधित व्यक्ती पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह, हे समजू शकणार आहे. यामुळे कोरोनामुक्तीसाठी नागरिकांनी स्वॅब द्यावेत, असे आवाहनही श्री. सोनार यांनी केले. 

आवश्य वाचा- सातपुड्यातील आदिवासींच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद 
 

आयुक्त शेख म्हणाले, की दिवाळीसह इतर विविध कारणांनी बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. अनेक जण मास्क न वापरता फिरत आहेत. महापालिका प्रशासन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करीत आहेत. असे असले तरी गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात अडचण येत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेने रॅपिड ॲन्टिजेन टेस्टची पाच केंद्रे सुरू केली आहेत. विशेषतः गर्दीच्या ठिकाणी ही केंद्रे सुरू केली आहेत. बाजारात मास्क नसलेल्या नागरिकांना महापालिकेचे कर्मचारी पकडून आणतील व त्यांची कोरोना टेस्ट घेतील. संबंधित व्यक्ती पॉझिटिव्ह आढळली, तर तिला उपचारासाठी पाठविले जाईल. धुळे शहर कोरोनामुक्तीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. शेख यांनी केले. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे