आधार कार्ड केंद्रात नोंदणी सुरू करा : जिल्हाधिकारी यादव 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 June 2020

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लागू नियमांचे काटेकोरपणे पालन न करणाऱ्या आधार केंद्राचे निलंबन आणि चालकाविरुद्ध आपत्ती कायद्याच्या तरतुदीअंतर्गत कारवाई होईल, असा इशाराही त्यांनी दिला. नागरिकांनी गर्दी न करता कोरोना प्रतिबंध सुरक्षेबाबत काळजी घेत नोंदणी करावी,

धुळे : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या निर्देशानुसार, कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्‍यक प्रतिबंधात्मक सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या अटी- शर्तींवर जिल्ह्यातील सर्व आधार नोंदणी केंद्र सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा सेतू समितीचे अध्यक्ष संजय यादव यांनी दिला. 
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लागू नियमांचे काटेकोरपणे पालन न करणाऱ्या आधार केंद्राचे निलंबन आणि चालकाविरुद्ध आपत्ती कायद्याच्या तरतुदीअंतर्गत कारवाई होईल, असा इशाराही त्यांनी दिला. नागरिकांनी गर्दी न करता कोरोना प्रतिबंध सुरक्षेबाबत काळजी घेत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. "कोरोना'मुळे 18 मार्चपासून सर्व आधार नोंदणी केंद्रे बंद होती. 

केंद्रांसाठी अटी-शर्ती अशा 
आधार नोंदणी केंद्रातील सामग्री, उपकरणांचे प्रत्येक व्यक्तीच्या भेटीनंतर निर्जंतुकीकरण करावे. केंद्र परिसराचे दर तीन तासांनी निर्जंतुकीकरण करावे. केंद्रचालक व ऑपरेटर यांनी स्वच्छताविषयक, पूर्ण वेळ मास्क लावणे, वारंवार साबणाने हात धुणे, सॅनिटायझर वापरणे, शारीरिक अंतर राखणे आदी नियमांचे पालन करावे. आधार केंद्राबाहेर हात स्वच्छ धुण्यासाठी साबण, पाणी व सॅनिटाइझरची सुविधा ठेवावी. ऑपरेटरने येणाऱ्या व्यक्तीचे नाक, तोंड व डोळ्यांना स्पर्श होणार नाही याची दक्षता घ्यावी. आधार केंद्रात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करावे.

नागरिकांनी मास्क लावणे आवश्‍यक 
सर्दी, खोकला, ताप, कफ, श्‍वासोच्छ्वासाच्या अडचणीसारखी लक्षणे आढळल्यास संबंधित व्यक्तींनी केंद्रात येऊ नये. आधार केंद्रावरील ऑपरेटरने कोविडच्या कंटेन्मेंट भागातून प्रवास करू नये, आधार केंद्राचा भाग किंवा परिसर प्रतिबंधित क्षेत्रात समाविष्ट झाल्यास, अशा गावातील, भागातील केंद्र सुरू करू नये. भविष्यात प्रतिबंधित क्षेत्र घोषित झाल्यावर तत्काळ केंद्र बंद करावे. प्रतिबंधित क्षेत्र खुले होईपर्यंत सेवा बंद ठेवावी. आधार केंद्रावर केवळ फोटो काढण्यावेळी मास्क काढण्याची परवानगी राहील. आधार केंद्र व्यवस्थापकाचा टेबल व ऑपरेटरची खुर्ची यात किमान पाच फुटांचे शारीरिक अंतर ठेवावे. गर्दी टाळण्यासाठी आधार केंद्रात कोणालाही परवानगीशिवाय प्रवेश देऊ नये. जिल्हाबंदी असल्याने जिल्हा सोडून अन्य जिल्ह्यांतील आधार नोंदणी व अपडेशन करू नये. तहसीलदारांनी आधार केंद्र चालकांवर नियंत्रण ठेवावे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule collector yadav declear aadhar card ragistretion open