धुळे, शिरपूरमध्ये कोरोनाचा कहर सुरूच... 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 June 2020

नागरिकांची आरोग्य तपासणीची व्यापक मोहीम हाती घेतली आहे. यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता योग्य दक्षता घ्यावी. कोरोना विषाणूची प्रारंभिक लक्षणे आढळून आल्यास तत्काळ रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले.

धुळे,ः शहरासह जिल्ह्यात आज तब्बल 51 कोरोना "पॉझिटिव्ह' रुग्णांची भर पडली, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. एकाच दिवसात जिल्ह्यात तब्बल 51 रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली. विशेष म्हणजे हे सर्व रुग्ण धुळे शहर व परिसर आणि शिरपूरमधील आहेत. त्यातही एकाच भागातले अनेक रुग्ण असल्याने चिंता वाढली आहे. जिल्हाभरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 548 वर पोहोचली. 
लॉक डाउन शिथिल झाल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. आज जिल्हा रुग्णालयातील 53 अहवालांपैकी तब्बल 26 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात पुरमेमाड्याचा एक, धुळे शहरातील अभय कॉलेजजवळील एक, दसेरा मैदान भागातील चार, तर मोगलाई भागातील तब्बल 20 रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, धुळे शहरातील चितोड भागातील एका 70 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 

शिरपूर शहरातही कहर 
धुळे शहराबरोबरच शिरपूरमध्येही कोरोनाचा वाढता कहर थांबायला तयार नाही. तेथील उपजिल्हा रुग्णालयात आज 41 अहवालांपैकी 25 अहवाल "पॉझिटिव्ह' आले. यात जिल्हा परिषदेच्या शाळेजवळील तब्बल 10 रुग्णांचा समावेश आहे. इतर 15 रुग्ण गुरुदत्त कॉलनी, सिद्धिविनायक कॉलनी, झेंडा चौक, पाटीलवाडा, कुंभारटेक, चौधरी गल्ली, फुले चौक, शिंपी गल्ली आदी विविध भागांतील आहेत. शिरपूरमधील दोन रुग्ण नाशिक येथे पॉझिटिव्ह आले. 

रुग्णसंख्या साडेपाचशेपर्यंत 
आज तब्बल 51 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हचा आलेख आता 548 पर्यंत गेला. त्यापैकी 47 जणांचा मृत्यू झाला आहे. यात धुळे शहरातील 21 तर उर्वरित जिल्ह्यातील 26 जणांचा समावेश आहे. 

घाबरू नका, तपासणी करा- जिल्हाधिकारी 
दरम्यान, जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर वेळेत औषधोपचार होऊन मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे यासाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून नागरिकांची आरोग्य तपासणीची व्यापक मोहीम हाती घेतली आहे. यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता योग्य दक्षता घ्यावी. कोरोना विषाणूची प्रारंभिक लक्षणे आढळून आल्यास तत्काळ रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corona patient graph high