esakal | संकटकाळात सेवा देणाऱ्या यंत्रणेला "सलाम'

बोलून बातमी शोधा

janta kafew

सायंकाळी पाचला नागरिकांनी आपापल्या घरांच्या दारात, खिडक्‍यात, बाल्कनीत येऊन टाळ्या-थाळ्या वाजवाव्यात, घंटानाद करावा असे आवाहन मोदींनी केले होते. या आवाहनाला धुळे शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. 

संकटकाळात सेवा देणाऱ्या यंत्रणेला "सलाम'
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी पुकारलेल्या जनता कर्फ्यूत आपापल्या घरांमध्ये बसून असलेले धुळे शहर व जिल्हावासीय या संकटकाळात इमाने-इतबारे सेवा बजावणाऱ्या आरोग्य व स्वच्छता यंत्रणेला "सलाम' करण्यासाठी दारे-खिडक्‍यात आली. टाळ्या आणि थाळ्या वाजवत नागरिकांनी यंत्रणेच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 

हेपण पहा -जनता कर्फ्यू लागण्यापुर्वी मध्यरात्रीच शुभमंगल सावधान... 


कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढत असल्याने तो रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. या आवाहनाला जिल्ह्यात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या जनता कर्फ्यूच्या आवाहनात पंतप्रधान मोदी यांनी कोरोना संसर्गाच्या या संकटकाळात अहोरात्र झटणारे डॉक्‍टर, परिचारिका, वैद्यकीय सेवेतील इतर कर्मचारी, स्वच्छता कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचेही आवाहन केले होते. यात सायंकाळी पाचला नागरिकांनी आपापल्या घरांच्या दारात, खिडक्‍यात, बाल्कनीत येऊन टाळ्या-थाळ्या वाजवाव्यात, घंटानाद करावा असे आवाहन मोदींनी केले होते. या आवाहनाला धुळे शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. 

शहरवासायींमध्ये उत्साह 
संपूर्ण दिवसभर घरात बसलेले धुळेकर नागरिक सायंकाळी पाचच्या सुमारास आपापल्या दारे, खिडक्‍या, बाल्कनीत आले. आणि टाळ्या, थाळ्या वाजवत यंत्रणेला त्यांच्या सेवेबद्दल सलाम केला. शहरातील महाराणा प्रताप चौक, फुलवाला चौक, आग्रारोड, गल्ली नंबर-4,5, नगरपट्टी, पारोळारोड, देवपूर मोचीवाडा यासह विविध भागातील नागरिकांनी या कृतज्ञता व्यक्त करण्याच्या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. तरुण-तरुणी, मध्यमवयीन, ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांचाही यात सहभाग होता. कुणाच्या हातात थाळी, कुणाच्या हातात टाळ तर कुणाच्या हातात मंदिराची घंटा होती. पेठ भागात अनेक लहान मुले रस्त्यावर येऊन थाळ्या वाजवत होते. अनेक ठिकाणी इमारतींवरील नागरिकांकडे तिरंगाही होता. धुळे शहरातील पेठ भागासह काही ठिकाणी काही तरुण घंटा वाजवत रस्त्यावर पाहायला मिळाले. काहींच्या हातात तिरंगाही होता. 

पोलिस, मनपाकडुनही सायरन 
कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या कार्यक्रमात पोलिसांनीही सहभाग नोंदविला. पोलिसांनी आपल्या वाहनांवरील सायरन वाजविले. महापालिकेनेही आपल्या जुन्या इमारतीमधील सायरन यावेळी वाजवला. महापालिकेच्या जुन्या इमारतीत भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी सायरन वाजवला. महापौर चंद्रकांत सोनार, नगरसेवक प्रदीप कर्पे, भिकन वराडे यांच्यासह मनपाचे कर्मचारी उपस्थित होते. या उपस्थितांनी टाळ्या वाजवत कृतज्ञता व्यक्त केली. 

मंदिरांमध्ये घंटानाद 
शहरातील विविध छोट्या-मोठ्या मंदिरांमध्ये घंटानाद करत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. काही मंदिरांमध्ये आजूबाजूचे नागरिकही जमा झालेले पाहायला मिळाले. घंटानाद केल्यानंतर लगेगच नागरिक आपापल्या घरी माघारी फिरले.