जनता कर्फ्यू लागण्यापुर्वी मध्यरात्रीच शुभमंगल सावधान... 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

कोरोना विषाणूला हरविण्यासाठी पाळण्यात आलेल्या कर्फ्यु ला प्रतिसाद म्हणून आम्ही आमचे लग्न रात्रीच लावले. देशावर आलेल्या संकटावेळी आम्ही समाजाला एक संदेश देऊ शकलो याचे आम्हाला निश्‍चित समाधान आहे. सर्व जनतेने कोरोनाला हरविण्यासाठी शासनाने दिलेले दिशानिर्देश पाळावेत अशी आम्ही विनंती करतो. 
- दीपक व सपना केदार, नवविवाहित दाम्पत्य.

तळोदा ः कोरोना व्हायरसला अटकाव करण्यासाठी जनता कर्फ्युच्या आवाहनाला प्रतिसाद देत तळवे येथे आज दुपारी होणारा लग्नसोहळा दोन्ही कुटुंबांचा सहमतीने रात्री बारा वाजता पार पडल्याची घटना तळवे तालुका तळोदा येथे घडली. त्यामुळे वर- वधूसह दोन्ही कुटुंबाचे कौतुक करण्यात येत आहे 

नक्‍की वाचा - आणि लग्नाची तारीख लोटली पुढे

कोरोना व्हायरसचा फैलाव देशात वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन केले होते. त्यात 22 तारखेलाच तळवे येथिल दीपक सुरेश केदार या वराचे मोड येथील सपना नाना सुर्यवंशी या वधुशी लग्न निश्‍चित झाले होते. मात्र कोरोनाला हरवायचे म्हणून कर्फ्यु पाळायची तयारीही होती. त्यामुळे लग्न कसे करावे या विचारात दोन्ही कडील कुटुंबे होती. 

हेपण वाचा - खायला कोठे मिळेल शोधत फिरला विदेश पाहुणा...पण लोकांनी बोलाविले पोलिसांना

अन्‌ मध्यरात्री बांधली गाठ 
तळवे येथील वर पिता सुरेश केदार व वधु पिता नाना उंदा सुर्यवंशी यांची भेट पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तळवे येथील सरपंच दशरथ बारीकराव व पोलीस पाटील भरत कांतीलाल पटेल, ग्रामपंचायत सदस्य नारायण ठाकरे यांनी घेतली. त्यात कर्फ्युबाबत चर्चा करत असताना दोन्ही कुटूंबानी 21 तारखेला रात्रीच लग्न आटोपून घेण्याचे मान्य केले. 

नातेवाईकांनाही रात्रीच आमंत्रण 
वधू पक्षाकडील सर्व नातेवाईकांना कळवून रात्रीच वधूला तळवे येथे आणण्यात आले. दोन्ही कुटूंबाच्या मोजक्‍या नातेवाईकांच्या उपस्थितीत रात्री साडेअकरा ते बारा वाजेच्या सुमारास हा लग्न सोहळा मोजक्याच लोकांच्या उपस्तीतीत पार पडला. यावेळी वधूचे मामा ऍड. दिनेश महिरे यांनी कोरोनाबद्दल लग्नवेळी माहिती देत उपस्थित वऱ्हाडीना जागरूक राहण्याचे आवाहन केले. त्यामुळे कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केदार व सुर्यवंशी कुटूंबाने दाखवलेल्या या समजूतदार पणाचे तालुक्‍यात कौतुक होत आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news tadoda marriage janta karfew and marriage night