esakal | नियम मोडणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल  
sakal

बोलून बातमी शोधा

dhule corporation

कोरोनाबाधितांच्या संख्येने जिल्ह्यात सहा हजाराचा टप्पा पार केला. मृतांचा आकडाही १८८ वर गेला आहे. असे असताना कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी प्रशासन फिजिकल डिस्टन्सींगचे पालन करावे, मास्क लावावा, दुकानदारांनी सम-विषमचा नियम पाळावा असे वारंवार आवाहन करत आहे.

नियम मोडणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल  

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे : कोरोना विषाणू संसर्गाचा धोका दररोज वाढत असताना व प्रशासनाकडून वारंवार नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत असताना अनेकजण हे नियम तुडवत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या पथकाने वरिष्ठांच्या आदेशानुसार गुरुवारी अशा नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला. संबंधितांकडून दंड वसुली न करता, त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सुमारे ७३ जणांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अधिकाऱ्यांनी सुरू केली होती. 

हेही वाचा - धुळे राज्यात दुसरे, देशात नववे...कशात मारली बाजी पहा 

कोरोनाबाधितांच्या संख्येने जिल्ह्यात सहा हजाराचा टप्पा पार केला. मृतांचा आकडाही १८८ वर गेला आहे. असे असताना कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी प्रशासन फिजिकल डिस्टन्सींगचे पालन करावे, मास्क लावावा, दुकानदारांनी सम-विषमचा नियम पाळावा असे वारंवार आवाहन करत आहे. मात्र, अनेकजण हे नियम पाळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी संजय यादव यांनीही कठोर पावले उचलण्याचा आदेश दिला. त्यानंतर आयुक्त अजीज शेख यांनी दिलेल्या आदेशानुसार महापालिकेच्या पथकाने गुरुवारी शहरातील आग्रारोड, झाशी राणी पुतळा परिसर, जेबी रोड, पाचकंदील, पारोळारोडसह बाजारपेठ भागात कारवाई केली. 

गुन्हा दाखल करणार 
गेल्या चार-पाच महिन्यांपासून नियम मोडणाऱ्यांवर महापालिकेचे पथक कारवाई करत आहे. कारवाईचे हे स्वरूप मात्र दंडात्मक स्वरुपाचेच होते. गुरुवारी मात्र दंडात्मक कारवाई न करता नियम मोडणाऱयांचे नाव-पत्ते घेण्यात आले. दुकानांमध्ये पाचपेक्षा अधिक लोकांची गर्दी, सम-विषम तारखेनुसार दुकाने उघडण्याचा नियम मोडणे, फिजिकल डिस्टन्स न पाळणे, मास्क न लावणे आदी विविध बाबींचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदार, फेरीवाले व नागरिक आदींचा यात समावेश आहे. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी अतिक्रमण निर्मलुन विभागाचे प्रसाद जाधव व कर्मचारी त्या-त्या भागातील पोलीस ठाण्यात गेले होते, प्रक्रिया सुरू होती. 

संपादन : राजेश सोनवणे 

loading image
go to top