महाआघाडी सरकारमुळे पाणीपुरवठा, रस्त्यांचे तीनतेरा 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 26 September 2020

शहरात सरासरी १५४ कोटींच्या निधीतून भुयारी गटारीचे, तर १७० कोटींच्या निधीतून अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (एमजेपी) नियंत्रणात होत आहे.

धुळे : शहरातील महत्त्वाकांक्षी भुयारी गटार आणि अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून होत आहे. ही संस्था महाआघाडी सरकारच्या नियंत्रणात आहे. तसेच शहराला दहा ते बारा दिवसांनी पाणीपुरवठा होतो. त्याचे कारण वीज कंपनी पुरेसा वीजपुरवठा एक्सप्रेस फिडरला देत नाही. ही संस्थाही सरकारच्या नियंत्रणात आहे. असे असताना विरोधक केवळ भाजपला बदनाम करण्यात गुंतल्याचा प्रत्यारोप या पक्षाचे शहर- जिल्हाध्यक्ष, तरूण नेते अनुप अग्रवाल यांनी केला. 
शहरात सरासरी १५४ कोटींच्या निधीतून भुयारी गटारीचे, तर १७० कोटींच्या निधीतून अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (एमजेपी) नियंत्रणात होत आहे. या योजनांविषयी तक्रारी, आरोप होत असून त्याचे पडसाद आंदोलनाच्या रूपाने उमटत आहेत. मात्र, विरोधक महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नावाने बोटे मोडण्यात गुंतले आहेत, अशी टिका नेते अग्रवाल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. 

जीवन प्राधिकरण जबाबदार 
नेते अग्रवाल म्हणाले, की भुयारी गटारीचे देवपूरमध्ये काम सुरू आहे. पावसाळा आणि त्यात खोदकामानंतर रस्ते दुरुस्ती होत नसल्याची ओरड आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ठेकेदारामार्फत ही योजना मार्गी लावत आहे. ठेकेदाराचा महापालिकेशी संबंध नाही. निविदेतील अटीशर्तीनुसार पाईप टाकल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती ठेकेदार आणि जीवन प्राधिकरणाने करावी. परंतु, प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे रस्त्यांची वाट लागली आहे. अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना प्राधिकरण करत आहे. ते पाहता योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटीस प्राधिकरण जबाबदार आहे. त्यास महापालिकेतील सत्ताधारी भाजप कसे जबाबदार असेल? 

सुरळीत वीजपुरवठा नाही 
धुळे शहरात दहा ते बारा दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार आहे. प्रत्यक्षात त्यासाठीच्या एक्सप्रेस फिडरला वीज कंपनी तीन- तीन दिवस वीजपुरवठा करत नसल्याने पंपिंग होत नाही. सुरळीत वीज पुरवठ्यासाठी महापालिकेने सतत पत्रव्यवहार केला. मात्र, स्थिती जैसे- थे आहे. वीज कंपनी महाआघाडी सरकारच्या नियंत्रणात असल्याने अनियमित पाणीपुरवठ्यास हेच सरकार जबाबदार आहे. मात्र, विरोधक अकारण धुळेकरांची दिशाभूल करत असल्याचा प्रत्यारोप नेते अग्रवाल यांनी केला. 

विरोधकांबाबत आश्‍चर्य वाटते.... 
जीवन प्राधिकरण, वीज कंपनी महाआघाडी सरकारच्या नियंत्रणात आहे. त्यामुळे योजनेतील गैरकारभारास, रस्ते, पाणीप्रश्‍नी धुळेकरांच्या हालअपेष्टांसाठी हेच सरकारच जबाबदार आहे. या स्थितीत विरोधक विनाकारण महापालिका, सत्ताधारी भाजपच्या विरोधात आरोपांचे शंख फुकत आहे. उलटपक्षी विरोधकांनी योजनेची सरकारच्या माध्यमातून योग्य पद्‌धतीने अंमलबजावणी करून घेण्याऐवजी ते आपल्याच महाआघाडी सरकारविरोधात आरोप करत असल्याचे आश्‍चर्य वाटते, अशी कोपरखळी नेते अग्रवाल यांनी लगावली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corporation bjp leader agrawal target mahavikas aaghadi goverment