esakal | भाजपमध्ये ‘नाराजीनाट्य'; धुळे मनपात सभापती निवडीदरम्यान नाराजी आली समोर! 
sakal

बोलून बातमी शोधा

Dhule corporation

७४ पैकी तब्बल ५० जागा जिंकत भाजपने महापालिकेची सत्ता मिळविली. या ५० नगरसेवकांमध्ये अनेकजण ऐन निवडणूकीच्यावेळी भाजपमध्ये गेले होते.

भाजपमध्ये ‘नाराजीनाट्य'; धुळे मनपात सभापती निवडीदरम्यान नाराजी आली समोर! 

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे : महापालिका स्थायी समिती सभापती व महिला बालकल्याण समिती सभापती, उपसभापती निवडीच्या निमित्ताने आज (ता.१८) महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांमधील नाराजीनाट्यही समोर आल्याचे पाहायला मिळाले. आम्हीही पद सांभाळायला समर्थ आहोत, त्यामुळे आम्हालाही सभापतिपद हवे असा सुर नाराज नगरसेवकांनी लावला. सभापती निवडीच्या सभेला दांडी मारत काहींनी नाराजी दर्शविण्याचा प्रयत्न केला तर एका नगरसेविकेने थेट महिला बालकल्याण समिती सदस्यत्वाचा राजीनामा सादर करत आपली नाराजी प्रकट केली. 

७४ पैकी तब्बल ५० जागा जिंकत भाजपने महापालिकेची सत्ता मिळविली. या ५० नगरसेवकांमध्ये अनेकजण ऐन निवडणूकीच्यावेळी भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे मूळचे भाजपचे व इतर अशा अनेक नगरसेवकांना विशेषतः महापौर व स्थायी समिती सभापतिपदी विराजमान होण्याची इच्छा आहे. मात्र, विविध कारणांनी त्यांची ही संधी हुकत असल्याचे दिसते.स्थायी समिती सभापतिपदासाठी इच्छुकांची नाराजी आज समोर आल्याचे पाहायला मिळाले. 

निवडीच्या सभेला दांडी 
स्थायी समिती सभापतिपदासाठी संजय जाधव यांचे नाव फायनल झाल्यानंतर आज निवडीसाठी विशेष सभा होती. या सभेला भाजपचे अमोल मासुळे व भारती माळी, किरण कुलेवार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगल चौधरी हे सदस्य अनुपस्थित होते. या चारपैकी भाजपचे श्री. मासुळे, श्रीमती माळी व श्रीमती कुलेवार यांच्या अनुपस्थितीची चर्चा रंगली. दरम्यान, श्री. जाधव यांची निवड घोषित झाल्यानंतर श्रीमती माळी सभागृहात आल्या खऱ्या पण त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा झालीच. श्री. मासुळे हेही या पदासाठी इच्छुक असल्याचे समजते. 

भामरे यांचा राजीनामा 
महिला बालकल्याण समितीत समावेश असलेल्या भाजपच्या नगरसेविका वंदना भामरे समितीच्या सभापती, उपसभापतिपदाच्या निवडीसाठी उपस्थित होत्या, मात्र ते समिती सदस्यत्वाचा राजीनामा घेऊनच आलेल्या होत्या. सभेनंतर त्या राजीनामा देण्यासाठी महापौर चंद्रकांत सोनार यांच्या दालनात जाऊन बसल्या, तेथे भारती माळीही होत्या. वैयक्तिक कारणामुळे महिला बालकल्याण समिती सदस्य म्हणून काम करण्यास इच्छुक नसल्याचे श्रीमती भामरे यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. दरम्यान, त्यापूर्वी महापौरांना दिलेल्या पत्रात त्यांनी २०२२-२३ साठी स्थायी समितीत घेऊन आपल्याला सभापतिपदाची संधी द्यावी असे नमूद केले होते. 

महापौर दालनात संताप 
दरम्यान, या नाराज सदस्यांच्या या पावित्र्यावरून महापौरांच्या दालनात भाजपचे पदाधिकारी संतापल्याचे सूत्रांकडून समजले. दालनात महापौर श्री. सोनार, श्रीमती भामरे, श्रीमती माळी, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, नगरसेवक हिरामण गवळी आदी उपस्थित होते. 

संपादन ः राजेश सोनवणे