esakal | "येस' बॅंकेतील गैरव्यवहारानंतर महापालिका "बॅंक' बदलणार ! 
sakal

बोलून बातमी शोधा

yes bank

"येस' बॅंकेतील गैरव्यवहारानंतर महापालिका "बॅंक' बदलणार ! 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : येस बॅंकेतील हजारो कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आल्यानंतर आपले कोट्यवधी रुपये सुरक्षित राहावेत यासाठी शासनाच्या निर्देशानुसार धुळे महापालिकेनेही आपली खाती राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये उघडण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी संबंधित राष्ट्रीयकृत बॅंकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. 
हजारो कोटी रुपयांच्या गैरव्यवहारामुळे येस बॅंकेतील खातेदारांची मोठी पंचाईत झाल्याचे तसेच विविध शासकीय विभाग, काही महापालिकांचे कोट्यवधी रुपये अडकल्याचेही पाहायला मिळाले होते. या सर्व पार्श्‍वभूमीवर शासनानेच आता विविध शासकीय विभागांना राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये खाते उघडण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने धुळे महापालिकेनेही तयारी सुरू केली आहे. 

बॅंकांकडून मागविले प्रस्ताव 
दोन दिवसांपूर्वीच महापालिका प्रशासनाने विविध राष्ट्रीयकृत बॅंकांच्या अधिकाऱ्यांना महापालिकेत बोलावले होते. महापालिकेची खाती उघडण्याच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार महापालिकेच्या आर्थिक व्यवहारासाठी कोणत्या सुविधा उपलब्ध करणार, कर्मचाऱ्यांना काय सवलती देणार आदी विविध मुद्‌द्‌यांवर बॅंकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. ज्या बॅंका चांगला प्रस्ताव देतील त्या राष्ट्रीयकृत बॅंकेत महापालिका आपली खाती उघडण्याची शक्‍यता आहे. 

सध्या या बॅंकांमध्ये खाती 
सद्यःस्थितीत महापालिकेची ऍक्‍सिस, एचडीएफसी आदी बॅंकांमध्ये खाती आहेत. विविध योजनांचे कोट्यवधी रुपये, मालमत्ता करासह इतर कराचा भरणा या बॅंकांमध्ये होते. अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वेतनही या बॅंकांमार्फत होते. मालमत्ता कर भरण्यासाठी सध्या एचडीएफसी बॅंकेची सुविधा उपलब्ध आहे. 
 
या बॅंकांचा पर्याय 
युनियन बॅंक, स्टेट बॅंक, बॅंक ऑफ बडोदा, कॉर्पोरेशन बॅंक, सेंट्रल बॅंक, महाराष्ट्र बॅंक, पंजाब नॅशनल बॅंक, बॅंक ऑफ इंडिया आदी राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये खाती उघडण्याचा पर्याय महापालिकेसमोर आहे. ज्या बॅंकांकडून चांगला प्रस्ताव येईल, त्या बॅंकेत खाती उघडले जाईल अशी शक्‍यता आहे. 

loading image