esakal | शहर स्‍‍वच्छतेसाठी फेब्रुवारीपर्यंत नवीन ठेका
sakal

बोलून बातमी शोधा

dhule corporation

नवीन ठेक्यासाठी निविदा प्रक्रियेसह दोन महिन्यांचा कालावधी जाणार असल्याने तूर्त रिलायबल कंपनीकडे अटी- शर्ती लागू करून तात्पुरत्या स्वरूपात कचरा संकलनाचा ठेका सोपविण्याचा निर्णय घेतला. त्यास सदस्यांनी मंजुरी दिली.

शहर स्‍‍वच्छतेसाठी फेब्रुवारीपर्यंत नवीन ठेका

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे : महापालिका क्षेत्रात कचरा संकलनाची वाट लावणाऱ्या वॉटरग्रेस कंपनीविरोधात तक्रारींसह जनक्षोभ निर्माण झाला. नंतर सत्ताधारी भाजपला स्थायी समितीच्या बैठकीत शहाणपण सुचले आणि तूर्त वसई (जि. पालघर) येथील रिलायबल एजन्सीकडे कचरा संकलनाची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय झाला. 

महापालिकेच्या सभागृहात स्थायी समितीची गुरूवारी (ता. ७) सभा झाली. सभापती सुनील बैसाणे अध्यक्षस्थानी होते. उपायुक्त गणेश गिरी, शांताराम गोसावी, प्रभारी नगरसचिव मनोज वाघ व्यासपीठावर होते सदस्य युवराज पाटील, भारती माळी, कमलेश देवरे, अमोल मासुळे, संतोष खताळ, सुनील सोनार, विमल पाटील, सईद बेग, सुरेखा देवरे, पुष्पा बोरसे आदींसह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. 

सभापतींनी पत्करला रोष 
शहरात तीन वर्षांत १७ कोटींहून अधिक रकमेतून नाशिकच्या वॉटरग्रेस कंपनीला कचरा संकलनाचे काम देण्यात आले. त्यात काही अधिकारी, नगरसेवक वाटेकरी असल्याने कचरा संकलनाच्या ठेक्याचा बोजवारा उडाल्याची चर्चा लपून राहिली नाही. ठेका दिल्यानंतर दहा महिन्यात सत्ताधारी भाजपची नाचक्कीही झाली. अखेर सभापती बैसाणे यांनी धाडस करत आणि स्व- पक्षातील काहींचा रोष पत्करत जनहितासाठी वॉटरग्रेस कंपनीचा ठेका डिसेंबरला संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला. 

फेब्रुवारीपर्यंत नवीन ठेका 
या स्थितीत झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सभापती बैसाणे यांनी नवीन ठेक्यासाठी निविदा प्रक्रियेसह दोन महिन्यांचा कालावधी जाणार असल्याने तूर्त रिलायबल कंपनीकडे अटी- शर्ती लागू करून तात्पुरत्या स्वरूपात कचरा संकलनाचा ठेका सोपविण्याचा निर्णय घेतला. त्यास सदस्यांनी मंजुरी दिली. उपायुक्त गोसावी म्हणाले, की तक्रारी आणि सुधारणेअभावी वॉटरग्रेस कंपनीकडून काम काढून घेण्यात आले. तीस जानेवारीपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करू आणि फेब्रुवारीपर्यंत नवीन ठेका देऊ. 

नगरसेवकांची मागणी 
नगरसेवक खताळ म्हणाले, की कंपनी कुठलीही असो कचरा संकलनाचे काम नीट व्हावे. मनपाची अनेक वाहने मोडकळीस आली आहेत. त्याचा खर्च वॉटरग्रेस कंपनीकडून वसूल करावा. वॉटरग्रेस कंपनीने दहा महिने काम केले. मात्र, जीपीएस यंत्रणा कार्यान्वित केली नाही. नवीन कंपनीला कठोरतेने अटी-शर्ती लागू कराव्यात. नगरसेविका माळी, खताळ, मासुळे यांनी अवैध नळ कनेक्शन, दूषित पाणीपुरवठा रोखणे, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे आणि महिला स्वच्छतागृहांची गरज व्यक्त केली. 
 
सोयीसाठी दोन तक्रार केंद्र 
कचरा संकलनप्रश्‍नी शहरात तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित करावा, अशी सूचना नगरसेवक मासुळे यांनी केली. नागरिकांच्या सोयीसाठी शहरात देवपूर व मध्यवर्ती ठिकाणी तक्रार कक्ष स्थापन करावा, नवीन कंपनीकडून अर्टी-शर्तींचा भंग होणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी, असा आदेश सभापती बैसाणे यांनी यंत्रणेला दिला. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

loading image