करवसुलीत पाच कोटींची पिछाडी 

रमाकांत घोडराज
Thursday, 27 August 2020

महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता करवसुलीसाठी दर वर्षी महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न होतात. यंदा कोरोना संकटामुळे या प्रयत्नांना खीळ बसली आहे. शिवाय नागरिकांकडेही पैशांची आवक नसल्याने ते कर भरण्यास पुढे येत नसल्याचे चित्र आहे.

धुळे : कोरोनाच्या संकटामुळे धुळे महापालिकेच्या मालमत्ता करवसुलीतही मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत साधारण पाच ते सहा कोटी रुपयांनी वसुलीची तफावत आहे. चालू मागणीबरोबरच थकबाकीचे प्रमाणही तब्बल ३० ते ३५ कोटीपर्यंत असल्याने महापालिकेच्या यंत्रणेपुढे करवसुलीचे मोठे आव्हान आहे. 

अवश्‍य वाचा - प्रसूतीसाठी धुळ्यात दोन स्वतंत्र दवाखाने

महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता करवसुलीसाठी दर वर्षी महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न होतात. यंदा कोरोना संकटामुळे या प्रयत्नांना खीळ बसली आहे. शिवाय नागरिकांकडेही पैशांची आवक नसल्याने ते कर भरण्यास पुढे येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे महापालिकेच्या करवसुलीवर मोठा परिणाम झाला आहे. सद्यःस्थितीत रोख रकमेसह धनादेश, ऑनलाइन पेमेंटची सुविधा आहे. मध्यंतरीच्या काळात करवसुलीसाठी संलग्न बँकेतील कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याने महापालिकेतील कर भरणा काउंटर बंद होते. दरम्यान, आता ते सुरू झाले असले, तरी कर भरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचा ओघ तुरळकच आहे. जे काही नागरिक कर भरत आहेत, ते महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन माध्यमांचा वापर करून हा कर भरत आहेत. 

रोजचा भरणा कमीच 
सद्यःस्थितीत मालमत्ता कराचा भरणा दहा लाखांच्या आतच आहे. कधी चार-पाच लाख, तर कधी आठ-साडेआठ लाखांपर्यंत वसुली होत आहे. दोन दिवसांत सहा लाख ३० हजार व आठ लाख ७९ हजार एवढी वसुली झाली होती. 

पाच- सहा कोटींची तफावत 
गेल्या वर्षाची (२०१९-२०) तुलना केली, तर ऑगस्टपर्यंत साधारण १२-१३ कोटी रुपये करवसुली झाली होती. यंदा मात्र हा आकडा सात कोटी १८ लाखांपर्यंतच आहे. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत पाच- सहा कोटी रुपये कमी वसुली झाली आहे. 

थकबाकीचेही आव्हान 
मालमत्ता कराची दर वर्षीची मागणी साधारण २८ कोटी रुपये आहे. या मागणीसह थकबाकी वसुलीचे आव्हान महापालिकेच्या मालमत्ताकर विभागापुढे असते. थकबाकी वसुलीचा आकडाही मोठा आहे. तब्बल ३०-३५ कोटी रुपये थकबाकी आहे. शिवाय थकबाकीवरील शास्ती (दंड) वसुलीचा प्रश्‍नही मोठा आहे. 

यंत्रणा कोरोनाच्या कामात 
कोरोना संकटाच्या उपाययोजनांसाठी महापालिकेची यंत्रणा तोकडी पडली आहे. त्यातही मालमत्ताकर विभागातील शंभर टक्के कर्मचारी कोरोनाच्या उपाययोजनांमध्ये लावले आहेत. त्यामुळे करवसुलीच्या कामावरही त्याचा परिणाम होत आहे. करवसुलीसाठी काही कर्मचारी महापालिकेत नेमले आहेत. 

सूट देऊनही प्रतिसाद नाही 
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मागणीचा रेटा वाढल्यानंतर महापालिकेने शास्तीवर सूट दिली आहे. ऑगस्टअखेर तब्बल ७५ टक्के व सप्टेंबरअखेर ५० टक्के सूट आहे. दरम्यान, भरघोस सूट दिल्यानंतरही थकबाकीदार कर भरायला पुढे येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नाच्या अनुषंगाने करवसुलीसाठी महापालिकेच्या यंत्रणेपुढे मोठे आव्हान आहे. 

संपादन : राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corporation five carrore tax recovery pending