प्रसूतीसाठी धुळ्यात दोन स्वतंत्र दवाखाने 

abdul sattar
abdul sattar

धुळे : नॉनकोविड रुग्ण व प्रसूतीसाठी धुळे शहरात दोन ठिकाणी स्वतंत्र दवाखाने सुरू करण्याचा निर्णय घेऊन तशी व्यवस्था निर्माण करण्याचा आदेश जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांना दिले, अशी माहिती पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. 
दरम्यान, कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी खासगी हॉस्पिटल अवाजवी बिल आकारत असतील, अशा बिलांच्या तक्रारींची चौकशीसाठी पथक नेमले आहे. डॉक्टर, हॉस्पिटल संचालकांनाही विनंती आहे, की असे प्रकार करू नयेत; अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा श्री. सत्तार यांनी दिला. 
पालकमंत्री श्री. सत्तार यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात विविध विभागांचा आढावा घेतला. नंतर लोकप्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. इतर महिला रुग्णांना (नॉनकोविड) त्यातही विशेषतः प्रसूतीसाठी स्वतंत्र व्यवस्था असावी, अशी मागणी आमदार मंजुळा गावित व लोकप्रतिनिधींनी केली. त्यानुसार धुळे शहरात दोन ठिकाणी स्वतंत्र दवाखाने सुरू करीत आहोत. शहरी व ग्रामीण अशा दोन्ही ठिकाणच्या रुग्णांवर तेथे उपचार होतील. 

नेर येथे कोविड सेंटर 
नेर (ता. धुळे) येथे कोविड केअर सेंटर कार्यान्वित करावे, अशी आमदार कुणाल पाटील यांनी मागणी केली. ती मान्य आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या प्राथमिक कोरोना टेस्टसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ व्यवस्था करण्याचेही नियोजन आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता सर्वोपचार रुग्णालयातील प्रयोगशाळेची क्षमता वाढविली जाईल. साक्री येथेही ऑक्सिजनयुक्त बेडची व्यवस्था तातडीने करण्याच्या सूचना श्री. सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिली. जे नागरिक, विक्रेते कोरोनाबाबत उपाययोजनांचे पालन करत नाहीत, अशांवर कारवाई करण्याचा आदेशही श्री. सत्तार यांनी दिला. 

लोकप्रतिनिधींशी चर्चा 
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी श्री. सत्तार यांनी चर्चा केली. जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, आमदार काशीराम पावरा, आमदार कुणाल पाटील, आमदार मंजुळा गावित, आमदार डॉ. फारुक शाह, उपमहापौर कल्याणी अंपळकर तसेच जिल्हाधिकारी संजय यादव, सीईओ वान्मती सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महापालिका आयुक्त अजिज शेख, अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शिवचंद्र सांगळे, डॉ. दीपक शेजवळ आदी उपस्थित होते. बैठकीत लोकप्रतिनिधींनी ऑक्सिजनचा पुरेसा साठा ठेवावा, स्वॅबचे अहवाल निर्धारित वेळेत मिळावेत, औषधसाठा ठेवावा यांसह विविध मागण्या केल्या. आवश्‍यक त्या मागण्यांच्या पूर्ततेचे आश्‍वासन श्री. सत्तार यांनी दिले. 

संपादन : राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com