esakal | धुळे मनपाचे नाक दाबून...तोंड उघडा; कचरा ठेकेदाराला ५५ लाखांचे बिल अदा 
sakal

बोलून बातमी शोधा

dhule corporation

शहरातील कचरा संकलनाचे काम बिल मिळत नसल्याच्या कारणावरून ठेकेदाराने दोन दिवसांपासून बंद केले होते. बिल न मिळाल्याने घंटागाड्यांना इंधन तसेच कामगारांच्या पगाराचा प्रश्‍न निर्माण झाल्याने घंटागाड्या बंद केल्याचे सांगितले जात होते.

धुळे मनपाचे नाक दाबून...तोंड उघडा; कचरा ठेकेदाराला ५५ लाखांचे बिल अदा 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : शहरातील कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराने बिल मिळत नसल्याच्या कारणावरून दोन दिवस घंटागाड्या बंद केल्या होत्या. दरम्यान, महापालिका प्रशासनाने गुरुवारी (ता. ८) च ठेकेदाराला बिल अदा केले. त्यामुळे शुक्रवारी (ता. ९) कचरा संकलन सुरू झाले. 
दरम्यान, कामबंद करा आणि बिल मिळवा हा प्रकार म्हणजे ‘नाक दाबले की, तोंड उघडते’ अशातला आहे. हा खेळ किती दिवस चालेल हा मात्र प्रश्‍न आहे. 
शहरातील कचरा संकलनाचे काम बिल मिळत नसल्याच्या कारणावरून ठेकेदाराने दोन दिवसांपासून बंद केले होते. बिल न मिळाल्याने घंटागाड्यांना इंधन तसेच कामगारांच्या पगाराचा प्रश्‍न निर्माण झाल्याने घंटागाड्या बंद केल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे शहरातील कचरा संकलन पूर्णपणे ठप्प झाले होते. त्यापूर्वीही शहराच्या अनेक भागांमध्ये आठ- आठ, दहा- दहा दिवस घंटागाड्याच आलेल्या नसल्याच्या तक्रारी होत्या. त्या अद्यापही कायम आहेत. 

५५ लाखांचे बिल अदा 
घंटागाड्या बंद झाल्याचा बोबाटा झाल्यानंतर प्रशासनाकडून गुरुवारीच ठेकेदाराला बिल अदा केले. ठेकेदाराचे ऑगस्टचे ५४- ५५ लाख रुपयांचे बिल पेंडींग होते ते मनपा प्रशासनाकडून अदा करण्यात आले. बिल मिळाल्यामुळे ठेकेदाराने शुक्रवारी कचरा संकलन सुरू केले. घंटागाड्या सुरू झाल्या असल्या, तरी त्या आज त्या कोणत्या भागात पोहोचल्या, कोणत्या भागात पोहोचल्या नाही, हा प्रश्‍न मात्र अनुत्तरित आहे. 

महिलांकडून कानउघाडणी 
गेल्या आठ- दहा दिवसांपासून वाडीभोकर रोडवरील काही कॉलन्यांमध्ये घंटागाडी पोहोचलेली नव्हती. शुक्रवारी तेथे घंटागाडी पोहोचली खरी, पण कचरा साठवून वैतागलेल्या महिलांनी संबंधित घंटागाडी चालक, कामगाराची चांगलीच कानउघाडणी केली. 
 
नेमकं कोण चुकतंय ? 
कचरा संकलनाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला बिल अदा करण्याची नेमकी पद्धती, सूत्र काय असा प्रश्‍न आहे. कारण बिल न मिळाल्याने कामबंद हा प्रकार नवीन नाही. त्यामुळे या प्रक्रियेत नेमका ठेकेदार चुकतोय की महापालिका प्रशासन असा प्रश्‍न उभा राहतो. त्याचे स्पष्टीकरण पुढे येणे गरजेचे आहे. प्रशासन चुकत नसेल तर ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे. 

loading image