पगारासाठी घंटागाड्या लागल्या मनपासमोर 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 May 2020

शहरातील कचरा संकलनाच्या समस्येकडे लॉकडाऊनमुळे कुणाचेही लक्ष नसल्याचे चित्र आहे. महापालिकेची बहुतांश यंत्रणाही कोरोना विषाणू संसर्गाविरोधात सुरु असलेल्या विविध उपाययोजनांमध्ये गुंतलेली असल्याने या प्रश्‍नाकडे कुणाचेही लक्ष नाही.

धुळे : कोरोना विषाणूच्या संकटकाळात शहरातील कचरा संकलनाच्या प्रश्‍नाने पुन्हा डोके वर काढले आहे. कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडीवरील कामगारांनी गेल्या महिना-दोन महिन्यापासुन पगार नसल्याच्या कारणावरुन आज सर्व घंटागाड्या थेट महापालिकेसमोर आणुन लावल्या. त्यामुळे कचरा संकलनाचे काम ठप्प झाले. 

क्‍लिक करा - Video घंटागाडीत चक्क माती, खडी भरली

शहरातील कचरा संकलनाच्या समस्येकडे लॉकडाऊनमुळे कुणाचेही लक्ष नसल्याचे चित्र आहे. महापालिकेची बहुतांश यंत्रणाही कोरोना विषाणू संसर्गाविरोधात सुरु असलेल्या विविध उपाययोजनांमध्ये गुंतलेली असल्याने या प्रश्‍नाकडे कुणाचेही लक्ष नाही. दरम्यान, या प्रश्‍नाने आज पुन्हा डोके वर काढल्याचे पाहायला मिळाले. कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडीवरील चालक, कामगारांना पगार नसल्याने या कामगारांनी आज आपापल्या घंटागाड्या थेट महापालिकेसमोर आणुन लावल्या. काही घंटागाड्या मनपा इमारतीसमोरील सर्वपल्ली राधाकृष्णन व्यापारी संकुलासमोर तर काही घंटागाड्या मनपाजवळील बोळीत (मातृसेवा संघाच्या शाळेजवळ) लावल्या होत्या. काही कामगारांनी निदर्शनेही केली. दरम्यान, सर्व कामगार मनपा आयुक्तांकडे आपल्या पगाराचे गाऱ्हाणे मांडण्याचा आग्रह धरत होते असे सुत्रांनी सांगितले. घंटागाड्यावरील कामगारांनी सकाळी आपापल्या भागात एक-एक ट्रीप मारली. दुसऱ्या ट्रीपला भागात न जाता मात्र, घंटागाड्या थेट मनाकडे वळविल्या. दरम्यान, घंटागाड्यांवरील कामगार हे ठेकेदाराने लावलेले कामगार आहेत, त्यांच्या पगाराचा विषयदेखील ठेकेदाराशी संबंधित असुन त्याचा महापालिकेशी संबंध नसल्याचे म्हणत या विषयातून अधिकारी अंग काढुन घेत असल्याचेही दिसुन आले. 

ठेकेदाराच्या बिलाचा प्रश्‍न 
कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराला मार्च-एप्रिल अशा दोन महिन्यांचे बिल महापालिकेकडुन अदा झाले नसल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, मार्चचे बिल अदा करण्याबाबत कार्यवाही झाली असुन कामगारांच्या पगाराचा प्रश्‍नही त्यामुळे मिटल्याचे व कामगार परतल्याचे मनपातील सुत्रांकडुन सांगण्यात आले. 
 
कोरोनाच्या धोक्‍यात झाली गर्दी 
कोरोना विषाणू संसर्गाचा धोका टाळण्यासाठी महापालिकेसह सर्वच प्रशासकीय यंत्रणा विविध उपाययोजना करत आहेत. यात कोणत्याही कारणाने नागरिकांची गर्दी होणार नाही. फिजिकल डिसटन्सींग पाळली जाईल यासाठी कारवाई करत आहे. फिजिकल डिस्टन्सींग न पाळणाऱ्या दुकानदारांना प्रत्येकी दोन हजार रुपये दंडही केला जात आहे. अशा परिस्थितीत पगाराची मागणी घेऊन अनेक घंटागाडीचालक व कामगार आज एकत्र आले. त्यामुळे या विषयाबाबत आता महापालिका काय करणार याकडे लक्ष आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corporation ghantagadi stop worker no payment