esakal | धुळे महापालिकेने खासगी रूग्‍णालयाबाबत घेतला असा निर्णय... अन्यथा होणार कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

dhule coproration

सरकारी रुग्णालयांवरील भार वाढल्याने, तेथील बेड फुल झाल्याने शहरात अतिरिक्त रुग्णालयांची आवश्यकता भासत आहे. त्यात खासगी दवाखाने, रुग्णालयांकडे कोरोनाचे रुग्ण उपचारासाठी आले, तर त्यांना दाखल करून घेतले जात नाही.

धुळे महापालिकेने खासगी रूग्‍णालयाबाबत घेतला असा निर्णय... अन्यथा होणार कारवाई

sakal_logo
By
निखिल सूर्यवंशी

धुळे : शहरातील खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णांवर उपचार करणे बंधनकारक असल्याचा आदेश महापालिकेने बजावला. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांच्या हालअपेष्टांत भर पडू नये, त्यांना वेळेत उपचारासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला. 
सरकारी रुग्णालयांवरील भार वाढल्याने, तेथील बेड फुल झाल्याने शहरात अतिरिक्त रुग्णालयांची आवश्यकता भासत आहे. त्यात खासगी दवाखाने, रुग्णालयांकडे कोरोनाचे रुग्ण उपचारासाठी आले, तर त्यांना दाखल करून घेतले जात नाही. त्यांच्याकडे उपचारासाठी दाखल रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या रुग्णास सरकारी रुग्णालयात पाठविण्यात येते किंवा अन्यत्र जाण्याचा सल्ला दिला जातो. परिणामी, रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे शक्‍य होत नाही. शहरात असे गंभीर प्रकार समोर येत आहेत. 
 
कायदेशीर कारवाईचा इशारा 
महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याच्या तरतुदीनुसार कोरोनाप्रश्‍नी रुग्णांवर औषधोपचार करणे बंधनकारक केले आहे. कोणतेही खासगी किंवा ट्रस्टच्या रुग्णालयाने कोरोना रुग्णास दाखल करणे, त्यांच्यावर उपचार करण्यास टाळाटाळ करू नये, सक्षम कारणाशिवाय तसेच महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी किंवा टास्क फोर्स समितीच्या संमतीशिवाय इतरत्र पाठवू नये. या आदेशाचे पालन न झाल्यास संबंधित रुग्णालयाविरुद्ध मुंबई नर्सिंग होम ॲक्ट १९४९ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाई केली जाईल. 

कर्मचाऱ्यांनाही सेवा बंधनकारक 
वैद्यकीय किंवा पॅरामेडिकल कर्मचारी, वॉर्ड बॉय व इतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सेवा बंधनकारक केली आहे. त्यांच्यावर जबाबदारी निश्चित केली आहे. त्यांनी सेवा देण्यास नकार दिल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. याअनुषंगाने खासगी रुग्णालयातील सर्व डॉक्टर, पॅरामेडिकल कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांचे नाव, पत्ता, दूरध्वनी किंवा मोबाईल क्रमांक तत्काळ महापालिका प्रशासनाकडे सादर करण्याचा आदेश आहे. जनहितासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. त्यास सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आयुक्त शेख यांनी व्यक्त केली. 


धुळ्यातील रुग्णालयांची स्थिती 
महापालिका क्षेत्रात खासगी सरासरी १५ मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आहेत. त्यात १२ हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ दिला जातो. त्यात रुग्णांवर मोफत उपचार होतात. तरतुदीबाह्य खर्च रुग्णाला करावा लागतो. या सर्व रुग्णालयांमध्ये मिळून सरासरी ४७ व्हेंटिलेटर, आयसीयू कक्ष आहे. खासगी रुग्णालयांमध्ये सुरवातीस २० बेड वापरात आले, तरी तीनशे बेडची सुविधा होते. गरजेनुसार उर्वरित बेड वापरात येऊ शकतात. 


विविध इमारतींवर ताबा 
महापालिकेने खासगी रुग्णालयापाठोपाठ रुग्णांना क्वारंटाइन किंवा उपचारासाठी अजमेरा संस्थेची इमारत, सिव्हिलमधील ईएनटी विभागाची इमारत ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ईएनटी विभागाच्या पाणी, प्रसाधनगृह, पंखे आदी सुविधा असलेल्या इमारतीत ५० बेड उपलब्ध होतील. तेथे ऑक्सिजन पॉइंटसह प्रसंगी व्हेंटिलेटरची सुविधा देता येईल. याप्रमाणे महापालिकेने काही इमारती आधीच ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे रुग्णांसाठी आता खासगी, सरकारी इमारतींची संख्या वाढेल. 

संपादन : राजेश सोनवणे

loading image