esakal | कुटूंबातीलच मानत पथकाचे शंभर मृतांवर अंत्यसंस्कार 
sakal

बोलून बातमी शोधा

Funeral

संकटकाळात मी इतक्या मृतदेहांवर प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे अंत्यसंस्कार केले, असे कुणी म्हटले तर त्याला अभिमानाच्या वर्गवारीत टाकायचे कसे, असा प्रश्‍न उभा राहील. परंतु जिथे कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र परिवार कोरोनाच्या धाकाने संबंधातील मृतदेह स्वीकारण्यास नकार देत होते,

कुटूंबातीलच मानत पथकाचे शंभर मृतांवर अंत्यसंस्कार 

sakal_logo
By
निखिल सूर्यवंशी

धुळे : जातिभेदाच्या भिंती भेदत, माणुसकी, बांधिलकी जोपासत महापालिकेच्या पथकाने कोरोनाबाधित शंभर मृतांवर अंत्यसंस्कार केले. या आजाराने सोमवारी शंभरावा बळी घेतल्यानंतर पथकाने अंत्यसंस्काराचा विधी पार पाडला. ही जबाबदारी तत्पर आणि निष्ठेने पार पाडणारे महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी चंद्रकांत जाधव व त्यांच्या सहकारी कर्मचारीवर्गाची प्रशंसा केली जात आहे. 
संकटकाळात मी इतक्या मृतदेहांवर प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे अंत्यसंस्कार केले, असे कुणी म्हटले तर त्याला अभिमानाच्या वर्गवारीत टाकायचे कसे, असा प्रश्‍न उभा राहील. परंतु जिथे कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र परिवार कोरोनाच्या धाकाने संबंधातील मृतदेह स्वीकारण्यास नकार देत होते, दूर पळत होते, तिथे कुणीतरी ‘परकी माणसं’ त्या मृतदेहावर अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पाडत होते आणि पार पाडत आहेत. ते खऱ्या अर्थाने ‘माणुसकी धर्म’ पाळत आहेत.

त्‍यांना वेगवेगळे अनुभव
आयुक्त अजिज शेख यांनी अत्यंविधीसाठी येणारी अडचण लक्षात घेऊन सहाय्यक आरोग्य अधिकारी जाधव व त्यांच्या पथकावर या कामाची जबाबदारी सोपवली. पथकाने जिवाची पर्वा न करता आतापर्यंत शंभर मृतांवर अंत्यसंस्कार केले. या स्थितीत पथकाला अनेक चांगल्या-वाईट अनुभवातून जावे लागले. परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत नेटाने जबाबदारी सांभाळली. पथकाला त्यांच्या कुटुंबानेही मानसिक पाठबळ दिले. त्यांचे कुटुंबीय कोणत्या मनःस्थितीतून जात असतील याची कल्पना न केलेली बरी. सामाजिक कार्यकर्ते प्रवीण अग्रवाल, रानमळाचे सरपंच प्रवीण पवार यांनी स्वमालकीची आठ एकर जागा महापालिकेस अंत्यविधीच्या कार्यासाठी उपलब्ध करून दिली. 

यांचे आहे सहकार्य
या कार्यात राजा हिंदुस्थानी ग्रुप, नगरसेवक अमीन पटेल व मित्र परिवार, चंदननगर मित्रमंडळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते यांनीही सामाजिक जाणीव ठेवत पुढाकार घेतला. रुग्णवाहिकाचालक अवू अन्सारी, स्वच्छता निरीक्षक विकास साळवे, महेंद्र ठाकरे, भरत येवलेकर यांनी स्वयंस्फूर्तीने मदत केली. महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त शेज, उपमहापौर कल्याणी अंपळकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, अधिकारीवर्गाने महापालिका पथकासह मदतकर्त्यांचे ऋण व्यक्त केले. 

संपादन : राजेश सोनवणे
 

loading image
go to top