मनपा करणार वर्षअखेर कचरा ठेकेदाराला ‘बाय-बाय' 

रमाकांत घोडराज
Thursday, 10 December 2020

शहरातील कचरा संकलन करणाऱ्या वॉटरग्रेस प्रॉडक्ट(नाशिक) यांच्याकडून आलेल्या खुलाशाच्या अनुषंगाने सादर अहवालावर विचार करण्याचा विषय समितीपुढे होता. या विषयावर सार्वजनिक आरोग्य विभागाकडून कंत्राटदाराच्या कामकाजाबाबत तक्रारी व आनुषंगिक माहिती देण्यात आली.

धुळे : शहरातील कचरा संकलन करणाऱ्या वॉटरग्रेस कंपनीचा गाशा डिसेंबरअखेर गुंडाळण्यात येणार आहे. डिसेंबरअखेर कंत्राटदाराचे काम थांबवा, नवीन कंत्राटदार नियुक्ती होईपर्यंत शहरातील कचरा संकलनासाठी पर्यायी व्यवस्था तयार ठेवा असा आदेशच सभापती सुनील बैसाणे यांनी आज स्थायी समिती सभेत दिला. दरम्यान, करार संपलेल्या जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही करावी, याची सुरुवात मात्र काँग्रेस भवनापासून करावी अशा सूचना श्री. बैसाणे यांनी प्रशासनाला दिल्याने हा विषय राजकीय पटलावर तापण्याची चिन्हे आहेत. 
महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक ऑनलाइन सभा आज सकाळी अकराला झाली. सभापती श्री. बैसाणे, उपायुक्त शांताराम गोसावी, नगरसचिव मनोज वाघ, सदस्य अमोल मासुळे, कमलेश देवरे, युवराज पाटील, हिना पठाण, अन्सारी फातेमा नुरुलअमीन, सईद बेग हाशम बेग आदी प्रत्यक्ष सभागृहात तर काही सदस्य ऑनलाइन उपस्थित होते. शहरातील कचरा संकलन करणाऱ्या वॉटरग्रेस प्रॉडक्ट(नाशिक) यांच्याकडून आलेल्या खुलाशाच्या अनुषंगाने सादर अहवालावर विचार करण्याचा विषय समितीपुढे होता. या विषयावर सार्वजनिक आरोग्य विभागाकडून कंत्राटदाराच्या कामकाजाबाबत तक्रारी व आनुषंगिक माहिती देण्यात आली. त्यानंतर सभापती श्री. बैसाणे यांनी कंत्राटदाराचे काम डिसेंबरअखेर थांबवा, नवीन निविदा प्रक्रिया होईपर्यंत पर्यायी व्यवस्था करा असा आदेश दिला. 

ब्लॅकलिस्टचा चेंडू प्रशासनाकडे 
गेल्या दीड-दोन वर्षात वॉटरग्रेस कंपनीने कचरा संकलनाचे काम करताना अटी-शर्तींचे केलेले उल्लंघन, तक्रारी पाहता कारवाईचाही मुद्दा होता. कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याचा विषय प्रशासनाने घ्यायचा होता, स्थायीपुढे तो कसा आणला अशी विचारणा करत सभापती श्री. बैसाणे यांनी याबाबत समिती गठीत करावी व प्रशासनाने कायदेशीर बाबींचा विचार करून निर्णय घ्यावा. न्यायालयात कॅव्हेट दाखल करावे अशा सुचनाही प्रशासनाला केल्या. दरम्यान, कचरा संकलनाबाबत सदस्य अन्सारी फातेमा नुरुलअमीन व हिना पठाण यांनी वॉटरग्रेस कंपनीला काळ्या यादीत टाका असा फलक घेऊनच सभागृहात प्रवेश केला. प्रभागात १५-१५ दिवस घंटागाडी येत नाही मग नागरिकांनी काय करावे असा प्रश्‍न श्रीमती पठाण यांनी केला. 

काँग्रेस भवन ताब्यात घ्या 
सभेत सदस्य कमलेश देवरे यांनी कराराने दिलेल्या महापालिकेच्या जागांचा विषयावर काय कार्यवाही झाली याबाबत माहिती विचारली. कराराने दिलेल्या जागांच्या अनुषंगाने संबंधितांना वकिलामार्फत नोटिसा बजावण्याची कार्यवाही सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, या विषयाचा संदर्भ घेत सभापती श्री. बैसाणे यांनी कराराने दिलेल्या जागा ताब्यात घ्या, याची सुरवात काँग्रेस भवनापासून करा असा आदेश दिला. आपल्याकडे मनुष्यबळ कमी असेल तर आपण स्वतः यासाठी येऊ असे सांगितले. सभापती श्री. बैसाणे यांच्या या आदेशवजा विधानाचे राजकीय पटलावर पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corporation waste contractor at the end of the year bye bye