कापूस खरेदी करतांना मापात पाप करणाऱ्या व्यापाऱ्याला शेतकऱयांनी बदडले !

एल. बी. चौधरी
Monday, 5 October 2020

जवळपास अर्धा ट्रक भरण्यात आला तेव्हा शेतकऱ्यांचे लक्षात आले की मापात पाप होत आहे. त्यांनी नीट तपासणी केली असता एक मण कापसामागे चार ते पाच किलो कापूस कमी भरत होता.

सोनगीर :कापसाच्या काही व्यापाऱ्यांना मापात पाप करणे खूपच महाग पडले. शेतकऱ्यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी व्यापाऱ्यांना चांगलेच चौदावे रत्न दाखवले. ही घटना हेंकळवाडी (ता. धुळे) येथे रविवारी घडली. याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून दिली. त्यामुळे शेतकरी समाधानी झाले असून त्यांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला.

आवश्य वाचा- साडेआठ कोटी रुपये खर्च  करून पाण्याची टाकी बांधली, पाणी भरताच ती लागली गळायला ! 
 

सध्या शेतकरीवर्ग कापूस काढण्यात व्यस्त असून बराचसा कापूस काढला गेला आहे. तो खरेदी करून परराज्यात विक्री करणारे बरेच व्यापारी गावोगावी जाऊन अधिक भावाचे आमिष दाखवून कापूस घेत आहेत. मुकटी ता. धुळे येथील काही व्यापारी हेंकळवाडी येथे कापूस खरेदीसाठी आले. सध्या ओला कापूस 3100 रुपये क्विंटल दराने विक्री होत आहे. व्यापाऱ्याने अधिक भाव 5000 रुपये क्विंटल देऊ केल्याने अनेक शेतकर्‍यांनी त्यांना कापूस विक्री केला.

अन शेतकरी संतापले

जवळपास अर्धा ट्रक भरण्यात आला तेव्हा शेतकऱ्यांचे लक्षात आले की मापात पाप होत आहे. त्यांनी नीट तपासणी केली असता एक मण कापसामागे चार ते पाच किलो कापूस कमी भरत होता. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना बेदम मारहाण केली.

व्हिडीओ व्हायरल झाला, पोलीस आले

याप्रकरणी कोणीतरी मारहाणीचा हा प्रकाराचा व्हिडीओ मोबाईलमध्ये केला आणि तो सोशल मिडीयावर व्हायरल केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांना माहिती मिळताच शेतकरी व व्यापाऱ्यांना बोलावून घेत आणि दोघांचे म्हणणे जाणून घेतले. अखेर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची तयारी व्यापारीने दर्शविली. त्यानुसार पोलीसांसमोरच नुकसान भरपाई दिली. त्यामुळे कोणताही गुन्हा दाखल न होता हे प्रकरण मिटले. यात सतीश आबाजी पाटील, विलास काशिनाथ पाटील, गोपीचंद आधार पाटील (सर्व हेंकळवाडी) आदी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली. 

वाचा- मुलाची केक कापण्याची तयारी; इतक्‍यात सिलेंडरचा भडका
 

जित्याची खोड मुडेना
मुकटी येथील हा व्यापारी खानदेशात अनेक गावात कापूस खरेदीत मापात पाप करतांना आढळून आला असून अनेक ठिकाणी मार खाल्ला आहे. मात्र तरीही त्याची खोड मोडली नाही. 
 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule cotton, the trader cheated while counting the cotton farmers killed the merchant