गोल्‍डन सुपर सीताफळ पोहचले उत्‍तर भारतात

custard apple dispatch
custard apple dispatch

म्हसदी (धुळे) : पूर्वी वनक्षेत्रात मुबलक मिळणारे सीताफळ आज शेतशिवारात ‘रामराज्य' करत आहे.'कोरोना’चे भययुक्त संकट आणि आर्थिक मंदीचा काळ असताना सीताफळने शंभरी पार केली आहे. दारखेल (ता.साक्री) येथील शिक्षक, होतकरू शेतकऱ्याच्या सीताफळने उत्तर भारतातील बाजार पेठेत दर्जा मिळवला.
सतत नैसर्गिक आपत्तींना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना फळपीक दिलासा देत आहे. पारंपारिक शेतीला छेद देत अनेक शेतकरी भाजीपाला व फळ शेतीला प्राधान्य देत आहेत. मजूरी आणि वाढत्या खर्चामुळे पारंपारिक शेती नकोशी झाली आहे. दारखेल (ता.साक्री) येथील प्राध्यापक शेतकरी गेल्या सोळा वर्षापासून फळ शेती करत आहे. प्रा. दिनकर गुलाब भामरे यांच्या शेतातील गोल्डन सुपर सीताफळ सध्या कोलकाता, पाटणा येथील बाजारपेठेत विकला जात आहे. 

सहा एकर क्षेत्रात बाग
गोल्डन सीताफळने उत्तर भारतातील व्यापाऱ्यांना भुरळ घातली आहे. सुमारे सहा एकर क्षेत्रात ही बाग सेंद्रीय पध्दतीने केली जात आहे.एक झाड वीस किलो उतारा देत असून एकशे अकरा रुपये प्रति किलो दर मिळत असल्याची माहिती प्रा.भामरे यांनी दिली. वृद्ध वडील गुलाब बळीराम भामरे व आई कासुबाई गुलाब भामरेसह परिवारातील इतर सर्व सदस्य व युवा शेतकऱ्यांच्या बळावर शेतीत बदल केल्याचे ते सांगतात. 

डाळिंबनंतर सिताफळ
प्रा. भामरे यांनी सलग बारा वर्षे डाळींबाची शेती केली. सध्या सात वर्षापासून सीताफळ घेतली जात आहे. यंदा जूनपासून अतिवृष्टी सुरू असल्याने बहुतेक ठिकाणी डाळिंब बागावर तेल्या, खरडा रोगाने कहर केला. अतिपावसामुळे खरिप पिकांसह भाजीपाला व फळशेती अडचणीत सापडली आहे. पण नैसर्गिक आपत्तीला तोंड देत सीताफळची गुणवत्ता टिकून ठेवल्याने दर टिकून आहेत.

नैसर्गिक आपत्तीचा धोका कमीच!
इतर फळ पिकांच्या तुलनेने सीताफळस नैसर्गिक आपत्तीचा फारसा धोका नसला; तरी प्रा. भामरे यांनी विशेष काळजी घेतल्याने पाचशे ते सातशे ग्रॅम प्रतिफळ वजन देत आहे. फळ काढणीच्या काळात पिठ्या ढेकूण वा फळमाशीचा प्रादुर्भाव असतो. अशावेळी एक वा दोन वेळा किटक नाशकाची फवारणी करावी लागते. 

इतर शेतकऱ्यांना प्रेरणा 
शेती परवडत नसल्याचे रडगाणे नेहमी शेतकरी करताना दिसतात. इतर पारंपारिक शेती यंदा तरी तोट्यात असली, तरी फळपीक शेती मात्र आर्थिक उभारी देत असल्याचे चित्र आहे. दारखेलच्या सीताफळचा डंका नंदुरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यासह उत्तर भारतात वाजत आहे. फळ शेतीला स्वतःच्या कुटुंबासह कृषी भुषण संजय भामरे, आदर्श शेतकरी राजेंद्र भामरे, नितीन ठाकरे, गणेश तोरवणे आदींचे मार्गदर्शन लाभत आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com