esakal | धुळे महापालिकेत जुन्याच कामांचा उदोउदो ! 
sakal

बोलून बातमी शोधा

धुळे महापालिकेत जुन्याच कामांचा उदोउदो ! 

महापौर सोनार यांनी प्रास्ताविकात नवीन कामांच्या तरतुदींचा उल्लेख करत यापूर्वीच मंजूर झालेल्या व कामे सुरू असलेल्या बहुतांश योजना, कामांचा उदोउदो केला. 

धुळे महापालिकेत जुन्याच कामांचा उदोउदो ! 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे ः अक्कलपाडा पाणीयोजना, भुयारी गटार योजना, शंभर कोटींचे रस्ते, टॉवर गार्डनचे नूतनीकरण, पांझरा नदीकाठी नवीन गार्डन, रेल्वेस्थानक रोड आदी विविध कामांचे दाखले देत येत्या वर्षभरात या सर्व योजना व कामे पूर्ण होतील, धुळेकर जनता आम्हाला डोक्यावर घेईल, असा दावा महापौर चंद्रकांत सोनार यांनी महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत केला. २०१९-२० च्या सुधारित व २०२०-२१ च्या अंदाजपत्रकात नव्याने ३० ते ३५ कोटींच्या तरतुदी करण्यात आल्या. त्यामुळे साधारण ८०० कोटींपर्यंत अंदाजपत्रक जाईल, असा अंदाज आहे. 

वाचा- गहू, तांदुळ द्या अन्‌ घेवून जा हवे ते; दिवाळीमुळे मिळतोय फराळ

महापालिकेच्या २०१९-२० च्या सुधारित व २०२०-२१ च्या अंदाजपत्रकावर चर्चा व मंजुरीसाठी महापालिकेची ऑनलाइन विशेष महासभा महापालिका सभागृहात झाली. महापौर सोनार, आयुक्त अजीज शेख, नगरसचिव मनोज वाघ, बरेच सदस्य प्रत्यक्ष सभागृहात, तर काही सदस्य ऑनलाइन उपस्थित होते. महापौर सोनार यांनी प्रास्ताविकात नवीन कामांच्या तरतुदींचा उल्लेख करत यापूर्वीच मंजूर झालेल्या व कामे सुरू असलेल्या बहुतांश योजना, कामांचा उदोउदो केला. 

महापालिकेतील भाजपच्या सत्ताकाळात १७० कोटींची अक्कलपाडा योजना, भुयारी गटारीची १५० कोटींची योजना, १०१ कोटींचे रस्ते, दहा कोटींचा रेल्वेस्थानक रोड, पांझरा नदीकाठी पाच कोटींचे गार्डन, पाच कोटींचे टॉवर गार्डन आदी विविध योजना, कामे मंजूर झाली व ही सर्व कामे सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांना थोडा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, येत्या वर्षभरात या योजना पूर्ण होतील. अक्कलपाडा पाणीयोजना वर्षभरात पूर्ण होऊन नागरिकांना रोज उच्च दाबाने पाणी मिळेल. त्यामुळे नागरिकांचा गैरसमज दूर होऊन धुळेकर नागरिक आम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्‍वास महापौर सोनार यांनी बोलून दाखविला. तसेच भाजपच्या सत्ताकाळात शहरासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना आम्ही आणल्या. मात्र, प्रसिद्धी केली नसल्याचेही ते म्हणाले. 
 

विरोधकांना आव्हान 
काही समस्या घेऊन विरोधक पत्रकबाजी करीत आहेत. मात्र, शहरासाठी आम्ही जेवढा निधी आणला त्याच्या दहा टक्के निधीही विरोधकांनी आणला तरी त्यांचे अभिनंदन करेन. आता राज्यात सरकार त्यांचे आहे. त्यामुळे त्यांनी १५० कोटींच्या हद्दवाढीच्या प्रस्तावासाठी प्रयत्न करावेत. मात्र, शहरासाठी तुम्ही काहीही केले नसेल तर तुम्हाला (विरोधक) बोलण्याचा अधिकार नसल्याचेही महापौर सोनार म्हणाले. नागसेन बोरसे, शीतल नवले, वंदना भामरे, प्रदीप कर्पे, भगवान गवळी, संजय पाटील, किरण अहिरराव, कल्पना महाले, हर्षकुमार रेलन, अमीन पटेल, सुनील बैसाणे, प्रतिभा चौधरी आदींनी चर्चेत भाग घेतला व कामांसाठी तरतुदीची मागणी केली. 

आवश्य वाचा- घरकुलात बांधले पैशांचे घर; आता होणार गुन्हा दाखल

२०२०- २१ चे अंदाजपत्रक असे 
-प्रशासन... ७२७ कोटी ५९ लाख रुपये 
-स्थायी समिती... ७६४ कोटी ४ लाख ६ हजार 
-महासभा...३०-३५ कोटींची वाढ 
-एकूण...८०० कोटीपर्यंत (अंदाजे) 

संपादन- भूषण श्रीखंडे