esakal | "कोरोना'चा विळखा : साडेचार हजार रुग्णांच्या शक्‍यतेने यंत्रणा तयारीत 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

जिल्ह्यात या आजाराची रुग्णसंख्या वाढू नये, या विषाणूचा प्रादुर्भाव आणि त्याचा फैलाव होऊ नये, यासाठी नागरिकांनी काटेकोरपणे नियम पाळणे, प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे,

"कोरोना'चा विळखा : साडेचार हजार रुग्णांच्या शक्‍यतेने यंत्रणा तयारीत 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

धुळे : राज्य शासनाच्या अनुमानानुसार दोन महिन्यांत कोरोना विषाणू संसर्गाची सुमारे साडेचार हजार रुग्णसंख्या होण्याची शक्‍यता आहे. ते लक्षात घेऊन लवकरच येथील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात वाढीव 55 खाटांचा "आयसीयू' कक्ष, तसेच जिल्ह्यात ऑक्‍सिजन सपोर्टच्या पाचशे खाटा उपलब्ध केल्या जातील. तसेच जिल्ह्यात साडेपाच हजार खाटांच्या उपलब्धतेचे प्रशासनाचे नियोजन आहे. 

जिल्ह्यात या आजाराची रुग्णसंख्या वाढू नये, या विषाणूचा प्रादुर्भाव आणि त्याचा फैलाव होऊ नये, यासाठी नागरिकांनी काटेकोरपणे नियम पाळणे, प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे, असे आवाहन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सत्तार यांची आज दुपारी चारनंतर पत्रकार परिषद झाली. जिल्हाधिकारी संजय यादव, महापालिका आयुक्त अजीज शेख, हिरे महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी. उपस्थित होते. 
 
प्रशासनाचे नियोजन 
मंत्री सत्तार, जिल्हाधिकारी यादव म्हणाले, की जिल्ह्यात पंधरा मेपर्यंत कोरोना रुग्णांची स्थिती नियंत्रित होती. नंतर मुंबई, नाशिकहून लाखो परप्रांतीय मजूर धुळे मार्गे मुंबई- आग्रा, सुरत- नवापूर महामार्गाने उत्तर प्रदेश, गुजरातकडे रवाना झाले. या कालावधीनंतर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची भर पडत गेली. शिवाय त्यात परजिल्ह्यातून परतणाऱ्या व्यक्ती, प्रवाशांनी भर घातली. ही स्थिती लक्षात घेता हिरे महाविद्यालयातील 45 खाटांच्या "आयसीयू' कक्षात आणखी 55 खाटा या आठवड्यापर्यंत वाढविल्या जातील. शिवाय हिरे महाविद्यालय, "सिव्हिल', दोंडाईचा व शिरपूर उपजिल्हा रुग्णालय, अन्य काही सेंटरमध्ये मिळून एकूण पाचशे खाटांना ऑक्‍सिजन सपोर्ट दिला जाईल. ही प्रक्रिया लवकरच पार पाडली जाईल. 
 
तपासणी, चाचणी वाढविली 
जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूदराचे प्रमाण वाढले. यासंदर्भात अतिगंभीर रुग्णांचे रिपोर्टिंग उशिरा झाले. मृत्यूदर कमी करण्यासाठी घरोघरी तपासण्या, सर्वेक्षण वाढविले. विशेषतः शिरपूर येथे पंधरा हजारांवर रुग्णांची तपासणी करून घेतली. हिरे महाविद्यालयातील प्रयोगशाळेत रोज तीनशे नमुन्यांची तपासणी होत आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. मात्र, प्रयत्नांती लवकरच ही संख्या कमी होण्यास सुरवात होईल, असा विश्‍वास आहे, असे मंत्री सत्तार, जिल्हाधिकारी यादव यांनी सांगितले. 
 
"एमआरआय'साठी निधी 
जिल्हा रुग्णालयात "एमआरआय'साठी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने नऊ कोटींऐवजी पंधरा कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती मंत्री सत्तार यांनी दिली. तसेच मास्क लावणे, वेळोवेळी हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझर वापरणे, शारीरिक अंतर पाळणे यासह विविध उपाययोजना नागरिकांनी राबविल्या तर कोरोनावर मात शक्‍य असल्याचा विश्‍वास मंत्र्यांनी व्यक्त केला. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले. 

loading image
go to top