coronavirus testing
coronavirus testing

धुळे जिल्ह्यात रोज ५० घरांची तपासणी 

धुळे : राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी `माझे कुटुंब- माझी जबाबदारी ही मोहीम जिल्ह्यात मंगळवारपासून (ता. १५) राबविली जात आहे. यात एका पथकात एक आरोग्य कर्मचारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेल्या दोन स्वयंसेवकांचा समावेश असेल. हे पथक रोज किमान ५० घरांना भेट देईल. या तपासणीत व्यक्तीचे तापमान आणि ऑक्सिजनची तपासणी होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी संजय यादव यांनी बैठकीत दिली. 

मोहिमेच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. श्री. यादव, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, महापौर चंद्रकांत सोनार, महापालिकेचे आयुक्त अजिज शेख, सीईओ वान्मती सी., आमदार काशिराम पावरा, आमदार मंजुळा गावीत, जिल्हा परिषद सभापती मंगला पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), डॉ. विक्रम बांदल (शिरपूर), जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शिवचंद्र सांगळे, कोरोनाचे नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील, महापालिकेचे उपायुक्त गणेश गिरी, शांताराम गोसावी आदी उपस्थित होते. 

फिव्हर क्लिनिक 
श्री. यादव म्हणाले, की या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गाव, पाड्यापर्यंत आरोग्य विभागाचे पथक पोहोचेल. ते प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करेल. कोमॉर्बिड आजाराचा रुग्ण असल्यास उपचार व नागरिकांना आरोग्य शिक्षण देण्यात येईल. ताप, खोकला, दम लागणे, ऑक्सिजनची पातळी कमी असेल, अशा कोरोनासदृश आजाराची लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींना जवळच्या फिव्हर क्लिनिकमध्ये दाखल केले जाईल. 

ऑक्टोबरला दुसरा टप्पा 
मोहिमेचा दुसरा टप्पा १४ ऑक्टोबरपासून सुरू होईल. तो २४ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल. मोहिमेत जिल्हा प्रशासनाबरोबर नागरिकांनी सहभागी व्हावे. वैद्यकीय अधिकारी पर्यवेक्षण करतील. अतिजोखमीचे रुग्ण व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेण्यास प्राधान्य द्यावे, असेही निर्देश श्री. यादव यांनी दिले. महापौर सोनार, डॉ. रंधे, आमदार पावरा, आमदार गावीत आदींनी विविध सूचना केल्या. जिल्हा परिषदेचे आरोग्याधिकारी डॉ. सांगळे यांनी प्रास्ताविक केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com