esakal | दराणे येथील तरुणाचा खून; ग्रामस्थांनी दीड तास रोखला रस्ता
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

दराणे येथील तरुणाचा खून; ग्रामस्थांनी दीड तास रोखला रस्ता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


चिमठाणे/सोनगीर : दराणे (ता. शिंदखेडा) येथील खासगी पशुवैद्यकीय व्यवसाय (Veterinary business) करणारा तरुण प्रेमसिंह राजेंद्रसिंह गिरासे (वय २०) शिंदखेडा येथून नवीन दुचाकीने येताना चिमठाणे येथील महावितरणच्या उपकेंद्राजवळ चोरट्यांनी त्याचा तीक्ष्ण हत्याराने पोटात भोसकून खून (Murder) केला. याप्रकरणी रात्री उशीरा खलाणे (ता. शिंदखेडा) येथील संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. खुनामुळे संतप्त ग्रामस्थांनी सोनगीर- दोंडाईचा रस्त्यावर दराणे फाट्याजवळ सुमारे दीड- दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. जिल्हा पोलिस अधिक्षक चिन्मय पंडित (Superintendent of Police Chinmay Pandit) व राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे यांनी ग्रामस्थांना आवाहन केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात तिसऱ्या लाटेची सज्जता


प्रेमसिंह गिरासे शिंदखेडा येथे नवीन दुचाकी घेण्यासाठी दोन मित्रांसोबत गेला होता. सोमवारी दुपारी दोन ते तीनच्या सुमारास नवीन दुचाकी घेऊन त्याने जुनी दुचाकी मित्रांकडे दिली. दराणे येथे मित्रांसोबतच घरी जात होता. नवीन दुचाकी सावकाश चालवायला सांगितल्याने मित्र काही अंतर पुढे गेले. गावच्या तीन किलोमीटरवरील वळणावर हल्लेखोरांनी प्रेमसिंगवर तीक्ष्ण हत्याराने वार केले. त्यात तो गंभीर जखमी झाला. मपण मदतीला कोणी थांबत नसल्याने दराणे येथील त्याच्या ओळखीचे बांधकाम ठेकेदार दिसल्याने मदतीसाठी त्यांना हाक दिली. कोण हाक मारत आहे, हे बघण्यासाठी ठेकेदार थांबला असता, प्रेमसिंग रक्तबंबाळ दिसून आला. त्याला तातडीने चिमठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने धुळ्यास नेण्यास सांगितले. चिमठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका चालक नसल्यामुळे खासगी मालवाहू वाहनाने प्रेमसिंहला सोनगीर ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. साधना पाटील यांनी त्याला मृत घोषित केले.

हेही वाचा: कोरोनामुळे २२ लाख मुले शाळाबाह्य-आमदार डॉ. सुधीर तांबे


नाशिक परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी सोमवारी धुळे पोलिस अधीक्षक कार्यालयात आढावा घेतला. दोंडाईचा येथे भेट देत त्यांना खुनाची सलामी मिळाली आहे. शिंदखेडा पोलिस ठाणे नेहमी आगळ्यावेगळ्या कारणाने चर्चेत राहते त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आल्याचे बोलले जात आहे.

loading image
go to top