मला काय समजावता; "त्या' दादालाही सांगा..! 

निखिल सूर्यवंशी
Friday, 17 January 2020

दहा ते वीस रुपयांत नशा 
तुटलेल्या वस्तू, शैक्षणिक प्रकल्पातील प्लास्टिकची कागदे चिकटविण्यासाठी वापरात येणारे "स्टीक फास्ट' किमान दहा ते वीस रुपयांत मिळते. त्याकडे स्वस्तातील नशा म्हणून पाहिले जाते. या संदर्भात सक्रिय रॅकेट उद्‌ध्वस्त करण्याची जबाबदारी नेते, अधिकारी पेलतात किंवा नाही हे पाहणे गरजेचे ठरेल. 

धुळे : रोजगाराचा अभाव, सामाजिक, राजकीयदृष्ट्या आणि मंदीच्या गर्तेत सापडलेल्या अस्वस्थ धुळ्यात "स्टीक फास्ट'ची नशा लावणारे रॅकेट सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. नशेसाठी चक्क देवपूरमध्ये भीक मागणारा आठ ते नऊ वर्षांचा मुलगा "चाइल्ड हेल्पलाइन'च्या माध्यमातून बालगृहात दाखल झाला. त्याचे समुपदेशन होत असताना "मला काय समजावता, त्या दादालाही सांगा...म्हणजे बाकीची मुलंही "स्टीक फास्ट'ची नशा करणार नाहीत', असे आर्जव त्याने केले. 

क्‍लिक करा - त्यांनी वर्गात सोडला साप...मग काय झाले पहा

भवितव्य कुठल्या दिशेला..? 
लगतच्या नंदुरबार, मालेगाव, नाशिक, जळगावच्या विकासाच्या तुलनेत पिछाडीवर असलेल्या धुळ्यासाठी कमालीचा चिंतेत टाकणारा हा प्रकार ठरत आहे. शिवाय त्याने रोजगारासह सामाजिक, राजकीय अस्थिरतेचा प्रश्‍न ऐरणीवर आणला आहे. नोटबंदीनंतर देशभरात निर्माण झालेल्या मंदीच्या गर्तेत जिल्ह्यासह धुळे शहरही सापडले. त्यातून मार्ग निघत नसताना लहानगी मुले आणि तरुणाई नशेच्या विळख्यात अडकत चालल्याने शहराचे भवितव्य कुठल्या दिशेला चाललेय हे कुठल्या भविष्यवेत्त्याने सांगण्याची गरज उरलेली नाही. त्यासाठी नेते, अधिकारी, विचारवंत आणि सामाजिक संस्था, व्यक्तींनी गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. 

नशेसाठी वाम मार्गाला 
शहरातील देवपूरसह मुस्लिमबहुल, अन्य अविकसित भागातील अनेक मुले, तरुणाईही नशेखोरीच्या विळख्यात सापडली आहे. त्याचा "सकाळ'ने माग घेतला असता नशेखोरीसाठी घरातच डल्ला मारणे, भीक मागणे, चोरी करणे, आई- वडिलांची दिशाभूल, फसवणूक करून वाद घालणे आदी गंभीर घटना घडत असल्याचे वास्तव समोर आले आहे. देवपूरमध्ये आजीकडे राहणारा मुलगा पाच महिन्यांपूर्वी भीक मागत असताना "चाइल्ड हेल्पलाइन'ला सापडला. नंतर त्याला बालगृहात बालकल्याण समितीपुढे उभे करण्यात आले. त्यातून देवपूर भागातही "स्टीक फास्ट'ची नशा करणारे आणि नशेला लावणारे रॅकेट असल्याची माहिती उजेडात आली. 

देवपूरमध्येही रॅकेट सक्रिय 
हातरुमालावर "स्टीक फास्ट' घेऊन त्याचा नाका-तोंडावाटे वास घेण्याची नशा असल्याचे बालगृहातील पीडित मुलाने सांगितले. "तो' वास मला हवाच असतो म्हणून भीक मागण्यास सुरवात केली. "स्टीक फास्ट'ने बोटेही चिटकतात. त्यामुळे ते सेवन करायचे नसते याची जाण त्या मुलाला होती. देवपूरमधील दत्तमंदिर ते नगावबारी चौफुली, डायव्हर्शन रोड परिसरापर्यंत "स्टीक फास्ट'च्या नशेखोरीचे रॅकेट असल्याची माहिती समोर आली. मोठी मुले चैन, नशेच्या नादात लहान मुलांना ही सवय लावून त्यांचेही भविष्य अंधारात ढकलत असल्याचे पीडित मुलाच्या समुपदेशनातून पुढे आले. "मला काय समजावताय, त्या दादालाही सांगा हे...मग बाकीची मुलेही नशा करणार नाहीत', असे आर्जव पीडित मुलाने केले. तो बालगृहात असून नियमित शाळेत जात आहे. तो तिसरीत आहे. त्याला नशेतून बाहेर काढण्यात बालकल्याण समितीला यश आले आहे. यासारखीच स्थिती शहरातील मुस्लिमबहुल भागात, अविकसित भागातही आहे. 
(क्रमशः) 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule drugs stick fast child