त्यांनी वर्गात सोडला साप...मग काय झाले पहा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

अग्रसेन विद्यालयात दोन टवाळ विद्यार्थ्यांनी प्लास्टिकच्या बरणीत सर्पमित्र असलेल्या वडिलांनी पकडून आणलेला सर्पच वर्गात सोडला. त्यामुळे वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये भितीने एकच धावपळ, धांदल उडाली होती. नंतर संबंधित विद्यार्थ्यांनी पुन्हा तो साप पकडून बरणीत बंद केला.

धुळे ः शाळा, महाविद्यालयांमधील टवाळखोर विद्यार्थ्यांचा उपद्रव अनेक शाळांमध्ये डोकेदुखीचा विषय आहे. पण टवाळखोरी करायची किती यालाही मर्यादा आहे. परंतु दोन मित्रांनी मिळून वर्गात चक्‍क जीवंत साप सोडण्याचा प्रकार केला. बाकाखाली साप आल्याने वर्गातील सर्वच मुले भेदरली होती. याची दखल घेत दोन्ही टवाळखोरांची शाळेतून हकालपट्टी करण्याची कारवाई केली. 

हेही पहा - पोलिस ठाण्यातच ते करायला गेले स्टिंग पुढे काय झाले पहा...

धुळे शहरातील श्री अग्रसेन महाराज प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात हा प्रकार घडला. शहरातील साक्रीरोड परिसरातील अग्रसेन विद्यालयात दोन टवाळ विद्यार्थ्यांनी प्लास्टिकच्या बरणीत सर्पमित्र असलेल्या वडिलांनी पकडून आणलेला सर्पच वर्गात सोडला. त्यामुळे वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये भितीने एकच धावपळ, धांदल उडाली होती. नंतर संबंधित विद्यार्थ्यांनी पुन्हा तो साप पकडून बरणीत बंद केला. या प्रकाराची गंभीर दखल घेत मुख्याध्यापक एन. सी. वाघ यांनी संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून हा प्रकार त्यांच्या कानावर घातला. एवढ्यावरच मुख्याध्यापक थांबले नाहीत तर त्यांनी थेट या दोन्ही विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखलेच पालकांच्या हातात टेकवले. 

छेड काढणाऱ्याचीही हकालपट्टी 
शाळेतील अन्य एक नववीचा विद्यार्थी शाळेतीलच एका सातवीच्या विद्यार्थिनीची नेहमीच छेड काढत असे. वारंवार ही छेडखानी सहन न झाल्याने संबंधित विद्यार्थिनीने छेड काढणाऱ्या मुलाला चांगलाच चोप दिला. या प्रकाराने शाळेत गोंधळ उडाला होता. मुख्याध्यापक वाघ यांनी या प्रकरणाचीही गंभीर दखल घेत छेड काढणाऱ्या संबंधित विद्यार्थ्याच्या वडिलांना शाळेत बोलावून प्रकार कानावर घातला व त्या विद्यार्थ्याचा शाळा सोडल्याचा दाखलाही वडिलांना देऊन टाकला. 

मुलींनी शिकविला धडा 
संबंधित विद्यार्थिनीने हिंमत दाखवत छेड काढणाऱ्या मुलाला अद्दल घडविल्याबद्दल पालकांसह तिचा शाळेतर्फे सत्कार झाला. शाळेच्या अध्यक्षांनी विद्यार्थिनीला पाचशे रुपयांचे बक्षीस देत टवाळखोरांना धडा शिकवा, आत्मसंरक्षण करा, असा संदेश दिला. शाळेतील तीन टवाळखोर विद्यार्थ्यांची हकालपट्टी केल्याची माहिती मुख्याध्यापक श्री. वाघ, उपमुख्याध्यापक प्रणव कोठवाल यांनी दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule high school student classroom snake