गुणात्मक विकासासाठी शाळांचे "ट्विनिंग'

तुषार देवरे
Tuesday, 12 May 2020

अपेक्षित उद्दिष्टपूर्तीसाठी केंद्रप्रमुखांनी सगुण विकास कार्यक्रमात सहभागी होऊन कामकाज तत्काळ पूर्ण करायचा असुन कार्यवाहीचा अहवाल कार्यालयास सादर करायचा आहे.
- जयश्री पाटील, जिल्हा नोडल अधिकारी, सगुण विकास कार्यक्रम

देऊर : विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी शासनाने सगुण विकास कार्यक्रम (ट्विनिंग ऑफ स्कूल) हाती घेतला आहे. त्यात जिल्ह्यातील 504 शाळांचे "ट्विनिंग' (गुणात्त्मक विकासासाठी दोन शाळा एकमेकांशी जोडणे) होत असून, एक हजार आठ शाळा सहभागी झाल्या आहेत. या शाळांचे "ट्विनिंग'चे काम केंद्रप्रमुखांच्या माध्यमातून सुरू आहे.

सगुण विकास कार्यक्रमांतर्गत सहभागी शाळांची संख्या वाढविण्यासाठी डाएट प्राचार्या डॉ. विद्या पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे. प्रत्येक केंद्रामधून किमान दोन शाळांमध्ये "ट्विनिंग' केले जात आहे. त्यानुसार प्रत्येक केंद्रातील शाळासिद्धीमध्ये "अ' ग्रेड प्राप्त शाळांपैकी एक शाळा जी इतर शाळांना सहकार्य अथवा गुणवत्ता वाढविण्यासाठी भागीदारी करेल. ही शाळा निवडण्याची जबाबदारी संबंधित केंद्रप्रमुखांना दिली आहे. केंद्रातील शाळांमधून शाळासिद्धी अभियानातील "अ' श्रेणी प्राप्त शाळेची निवड करून शाळेला दुसरी शाळा जोडावी लागणार आहे.

काय आहे सगुण विकास?
सगुण विकास कार्यक्रमात परिसरातील दोन शाळांनी एकत्र येऊन विकासातील कच्च्या दुव्यावर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये सुसंवाद निर्माण करणे व एकमेकांच्या परंपरा व संस्कृती शिक्षणाच्या माध्यमातून समजावून घेणे. यासाठी उद्दिष्टनिहाय, नियोजनपूर्वक, नियोजित कालावधीसाठी एकत्र येणे अभिप्रेत आहे. यामध्ये दोन शाळांमध्ये सहकार्यात्मक पद्धतीने औपचारिक व अनौपचारिक उपक्रमांचे सादरीकरण करणे, विविध उपक्रम व कार्यक्रमांसाठी वर्षभरात अनेक वेळी एकत्र येऊन विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक अनुभव मिळविण्याची संधी निर्माण करणे अपेक्षित आहे.

 

तालुका... ट्विनिंग संख्या... सहभागी शाळा
धुळे ग्रामीण...110... 220
धुळे शहर(मनपा)... 50...100
साक्री... 160... 320
शिंदखेडा... 84...168
शिरपूर... 90...180
एकूण... 504...1008.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule education deparment school devlopment twining