esakal | मूळ समस्येला बगल; आणि ‘रस्त्यांवर जत्रा’ 
sakal

बोलून बातमी शोधा

मूळ समस्येला बगल; आणि ‘रस्त्यांवर जत्रा’ 

रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांमुळे त्या- त्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. यातून वाद होतात. या वादाचे पर्यावसान नंतर मोठ्या वादात होण्याचा धोका वाढतो.

मूळ समस्येला बगल; आणि ‘रस्त्यांवर जत्रा’ 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे ः शहराच्या विविध भागांत रस्त्याच्या कडेला भाजीपाल्यासह इतर विविध साहित्याची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची जत्रा पूर्वीपेक्षा जास्त वाढली आहे. यामुळे वाहतूक कोंडीसह विविध समस्या पुढे येताना दिसत आहेत. शहरात फेरीवाल्यांसाठी पर्यायी व्यवस्थाच न केल्याने ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करून त्याची कठोर अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत ही समस्या सुटणार नाही. त्यामुळे महापालिका व पोलिसांनी या मूळ प्रश्‍नाकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

आवश्य वाचा-  ग्रा.पं.च्या निवडणुका होणार लक्षवेधी; इच्छुकांची परीक्षा, मोर्चाबांधणी सुरू ! 

फेरीवाल्यांची समस्या शहरात नवीन नाही. मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोड, पाचकंदील भागात, तर चालायला जागा नाही, अशी स्थिती आहे. हातगाडी, पथारीवर व्यवसाय करणारी मंडळी पोटापाण्यासाठी ही दुकाने थाटतात हे खरे, पण का कुणास ठाऊक, ही मंडळी कोणत्याही यंत्रणेला जुमानत नाही. त्यामुळे समस्या अधिक गंभीर होत आहे. रस्त्यांवर व्यवसाय थाटून रस्ते ब्लॉक करणारी ही समस्या केवळ आग्रा रोड, पाचकंदीलपुरतीच मर्यादित राहिलेली नाही. सिव्हिल हॉस्पिटल रोड, साक्री रोड, पारोळा रोड, बारापत्थर रोड, चर्नी रोड, देवपूरमध्ये दत्तमंदिर चौक व परिसर, नकाणे रोड अशा शहराच्या साधारण सर्वच भागांत या समस्येने पाय पसरले आहेत. 

वाहतूक कोंडीसह वाद 
रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांमुळे त्या- त्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. यातून वाद होतात. या वादाचे पर्यावसान नंतर मोठ्या वादात होण्याचा धोका वाढतो, ही सर्व परिस्थिती पोलिस प्रशासनासाठीही डोकेदुखी ठरत आहे. तत्कालीन पोलिस अधीक्षकांनी या समस्येच्या अनुषंगाने महापालिकेला धोक्याचा इशाराही दिला होता. 

वाचा- शेतकऱ्यांना वीज, पाणी मुबलक उपलब्ध होणार 

कोरोनामुळे धोका अधिक 
कोरोना संसर्गाचा प्रभाव कमी झालेला असला तरी धोका कायम आहे. अशा स्थितीत फेरीवाले व इतर व्यावसायिकांची ही जत्रा गंभीर धोका निर्माण करणारी आहे. त्यामुळे महापालिकेसह पोलिस यंत्रणेने याकडे डोळेझाक करणे चुकीचे आहे. 


मूळ समस्या सोडवा 
फेरीवाल्यांना रस्त्यांवरून हटविण्यासाठी काही वर्षांत अनेकदा कारवाया झाल्या, मोहिमा राबविण्यात आल्या. यातून काहीही साध्य झालेले नाही. त्यामुळे कारवाईचा देखावा न करता, यंत्रणेचा श्रम आणि खर्च वाया न घालता पर्यायी व्यवस्थेच्या मूळ प्रश्‍नावर काम करण्याची गरज आहे. स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे यांनी हा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनीही या मूळ प्रश्‍नावरच आधी काम केले, तर उपयोग होईल; अन्यथा त्यांचाही प्रयत्न ‘चलती का नाम गाडी...’ या प्रकारातच गणला जाईल. 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image