esakal | ओला दुष्काळ जाहीर करा, भरपाई द्या : माजीमंत्री महादेव जानकर 
sakal

बोलून बातमी शोधा

ex minister mahadev jankar

धुळ्यासह राज्यभरात परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या संकटात सरकारने शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची गरज आहे. मागणीसाठी क्युमाईन क्लबसमोर धरणे आंदोलनात श्री. जानकर यांनीही सहभाग घेतला.

ओला दुष्काळ जाहीर करा, भरपाई द्या : माजीमंत्री महादेव जानकर 

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे : अतिवृष्टीसह परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. या संकटात सरकारने संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई ताबडतोब द्यावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा माजीमंत्री महादेव जानकर यांनी केली. क्युमाईन क्लबसमोर धरणे आंदोलनानंतर ते बैलगाडीवर बसून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. 

धुळ्यासह राज्यभरात परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या संकटात सरकारने शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची गरज आहे. मागणीसाठी क्युमाईन क्लबसमोर धरणे आंदोलनात श्री. जानकर यांनीही सहभाग घेतला. महायुतीत असताना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाईची मागणी केली होती. आता ते स्वत:च मुख्यमंत्री असल्याने त्यांनी शेतकऱ्यांना ताबडतोब ही मदत जाहीर करावी अशी मागणी श्री. जानकर यांनी केली आहे. 

बैलगाडीवरून पोहचले जिल्‍हाधिकारी कार्यालयावर
नंतर श्री. जानकर बैलगाडीवर बसून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेले. तेथे जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. धुळे जिल्ह्यासह राज्यभरात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कापूस, मका, सोयाबीन, बाजरी, भुईमूग, कांदा आदी पिके संपूर्णपणे नष्ट झाली. शेतकऱ्याच्या घरादारात पीक येत असतांनाच अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने केवळ २५ टक्के उत्पन्न आले. त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात आहे. नेहमीप्रमाणे सरकारने मात्र पंचनाम्याचे नाटक सुरू केले आहे, कागदी घोडे नाचवून सरकार वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत असल्याचे पक्षाने म्हटले आहे. नुकसान भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही रासपने दिला. श्री. जानकर यांच्यासह बाळासाहेब दौडतले, जिल्हाध्यक्ष जिंतेद्रसिंग राजपूत, सुभाष राजपूत, युवराज मोहिते, माणिकराव दांगडे पाटील, कैलास हाळनोर, मनोहर चौधरी, सलीम खाटीक, मुश्ताक शाह, योगेश अहिरे, रवी पवार, राजा पोथारे आदींचा आंदोलनात सहभाग होता. 

संपादन ः राजेश सोनवणे