esakal | चौपदरीकरणाचे काम सुरू; फागणे-नवापूर महामार्ग 
sakal

बोलून बातमी शोधा

fagne nagpur highway

फागणे ते नवापूर महामार्गाचे काम गुणवत्ता पूर्ण होईल. दोन वर्षांत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभाग लक्ष ठेवून राहील. सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. 
-अरविंद काळे, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, धुळे 

चौपदरीकरणाचे काम सुरू; फागणे-नवापूर महामार्ग 

sakal_logo
By
तुषार देवरे

देऊर (धुळे) : नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील फागणे (ता. धुळे) ते नवापूर (जि. नंदुरबार) हद्दीपर्यंत १४० किलोमीटरच्या अपूर्ण प्रलंबित कामास गुरुवार (ता. १)पासून सुरवात झाली. या संदर्भात ‘सकाळ’ने सतत समस्या मांडल्या. तसेच १ ऑक्टोबरपासून कामास सुरवात होणार असल्याचे ‘सकाळ’ने प्रकाशित केले होते. त्याचा परिणाम कुसुंबा (ता. धुळे) येथील अर्धवट राहिलेल्या पुलापासून महामार्ग चौपदरीकरणाच्या कामास सुरवात झाली. त्यामुळे प्रवासी, नागरिकांनी ‘सकाळ’चे आभार मानले. 
ईपीसी तत्त्वावर तीन टप्प्यांत जे. एम. म्हात्रे कंपनीने कामाचे नियोजन केले आहे. यासाठी कंपनी कामगारसंख्या वाढवून कामाला गती देणार आहे. यात ९८० कोटींच्या निधीतून अपूर्ण काम केले जाईल. 

अडथळा नको 
कुणीही कामाला विनाकारण अडथळा आणू नये. विकासकामात राजकारण करू नये, ही नागरिकांना अपेक्षा आहे. यापूर्वीच दोन वर्षांपासून कामाला खोडा बसला आहे. शेतीलगत रस्त्याच्या समस्या सामोपचाराने सोडविल्या जातील. मात्र, विरोध म्हणून कामबंद करू नका, अशी अपेक्षा कंपनीच्या सूत्रांनी व्यक्त केली. 

कंपनीने काळजी घ्यावी 
महामार्गाचे काम दर्जेदार व वेळेत होण्यासाठी म्हात्रे कंपनीने स्वतः काम करावे. उपठेका देताना चांगली उपकंपनी, ठेकेदारांना काम द्यावे, अन्यथा मूळ कंपनीला अडचण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वीची पार्श्वभूमी कंपनी अधिकाऱ्यांनी तपासावी. कामाला पुढे गती मिळण्यासाठी उर्वरित भूसंपादनाचा प्रश्न निकाली काढणे आवश्यक आहे. काही ठिकाणी भूसंपादनाचा प्रश्न प्रलंबित आहे. तो मार्गी लावावा. 

नागरिक धूळ, खड्ड्यांनी त्रस्त 
प्रलंबित पुलाच्या ठिकाणी बाह्यरस्ता काढला आहे. त्यावर मोठ्या प्रमाणावर धूळ उडते. या समस्येने वाहनचालक, प्रवासी त्रस्त आहेत. त्यावर उपाययोजनांसह जीवघेणे खड्डे बुजविण्यात यावेत, अशी वाहनचालकांची मागणी आहे.