सांगलीच्या मक्तेदारांना साडेसहा लाखांचा गंडा; मजूर पुरविण्याचा होता ठेका

suger worker contractor fraud
suger worker contractor fraud

शिरपूर (धुळे) : ऊसतोड करून देऊ अशी हमी घेतली, ऊसतोड करणारे मजूर दाखवून उचलही घेतली. प्रत्यक्षात मजूर घेण्यासाठी वाहन घेऊन आलेल्या सांगलीकर मक्तेदारांना ‘गुपचूप निघा, नाहीतर जिवंत परत जाऊ देणार नाही,’ अशी धमकी देऊन हाकलले. घडल्या प्रकारात हातचे साडेसहा लाख घालवून बसलेल्या मक्तेदारांनी भानावर आल्यानंतर महिनाभराने फिर्याद दिली. तथाकथित मजूर ठेकेदारांसह तब्बल ३३ जणांविरोधात सांगवी (ता. शिरपूर) तालुका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. 
सुशांत पाटील (वय २८, रा. डिग्रस, ता. मिरज, जि. सांगली) व त्यांच्या सहकाऱ्यावर हा प्रसंग गुदरला. संबंधित चौघांचा उसाची कंत्राटी तत्त्वावर तोड करून साखर कारखान्यांना पुरविण्याचा व्यवसाय आहे. यंदाच्या हंगामासाठी मजुरांच्या शोधात ते ६ ऑक्टोबरला नागेश्वर (ता. शिरपूर) येथे आले असता, तथाकथित ठेकेदार डुबा तथा खुमसिंह पावरा व दलसिंह किलू पावरा (दोघे रा. महादेव दोंदवाडा, ता. शिरपूर) त्यांना भेटले. 

ठेकेदार असल्‍याची पटविली खात्री
आपल्याकडे ऊसतोड मजुरांची तयार टोळी असल्याचे त्यांनी सांगितल्याने पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी महादेव दोंदवाडा येथे भेट देऊन खात्री केली. तेथील गावपाटील रायसिंग यानेही दोन्ही ठेकेदार असल्याची खात्री पटवली. त्यामुळे खुमसिंहशी पाटील यांनी साडेतीन लाख रुपये, तर दलसिंहशी साडेपाच लाख रुपयांचा तोंडी करार केला. कराराची नोटरी व मजूर पाहण्यासाठी पाटील यांनी ७ ऑक्टोबरला शिरपूरला बोलावले. त्याप्रमाणे दोघे ठेकेदार मजूर घेऊन गेले. नोटरी झाल्यावर कराराप्रमाणे मजुरांना एकूण सहा लाख ६५ हजार रुपयेही दिले. 

धमकावण्यास सुरवात
शेतातील बाजरी आणि कपाशी काढून आम्ही १० ऑक्टोबरला डिग्रस येथे पोचतो, असे आश्वासन संबंधितांनी दिले. मात्र, मजुरांना सोबतच घेऊन निघू, असा विचार करून सुशांत पाटील, वसंत हौजे, अभिजित पाटील व प्रमोद लांडे शिरपूरलाच थांबले. दोन आयशर घेऊन चौघेही १० ऑक्टोबरला महादेव दोंदवाडा गावात पोचले. संशयितांनी त्यांना गावात अंत्ययात्रा असून, थोड्या वेळाने गाडी भरू, असे सांगितले. बराच वेळ होऊनही कुणीच न आल्याने पाटील यांनी ठेकेदारांना फोन केल्यावर संशयितांनी ‘मजूर येणार नाहीत, पैसेही परत देणार नाहीत, आले तसे परत फिरा, नाहीतर जिवंत जाऊ देणार नाही,’ अशी धमकी दिली. भेदरलेले मक्तेदार परत फिरले. ९ नोव्हेंबरला पाटील यांनी फिर्याद दिली. दोघा ठेकेदारांसह ३३ जणांच्या टोळीविरोधात गुन्हा दाखल झाला. दरम्यान, परजिल्ह्यातील मक्तेदारांची फसवणूक झाल्याचा लागोपाठ दुसरा गुन्हा आहे. याआधी शहर पोलिस ठाण्यात दोन ठेकेदारांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com