बळीराजापुढे खरिपासाठी अनेक आव्हाने 

kharip hangam
kharip hangam

धुळे : जगाचा पोशिंदा म्हटल्या जाणाऱ्या बळीराजापुढेही "कोरोना'मुळे अनेक संकटे उद्‌भवली आहेत. तरीही आज या बळीराजामुळेच भारतासारख्या कृषिप्रधान देशात "लॉक डाउन'च्या काळातही अन्नधान्याचा तुटवडा जाणवलेला नाही. असे असले, तरी आगामी खरीप हंगामाच्या दृष्टीने या बळीराजापुढे अनेक आव्हाने असून, त्यावर मात कशी करावी, असे प्रश्‍नचिन्ह "कोरोना'मुळे उद्‌भवले आहे. यात शासन-प्रशासन आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून सकारात्मक उपाययोजना राबविल्या गेल्या, तर नक्कीच यावर मात करता येणार आहे. 

काय आहेत समस्या? 
"कोरोना'मुळे देशभरातील "लॉक डाउन'चा कालावधी तीन मेपर्यंत वाढविला गेला आहे. अशातच शेतकऱ्यांपुढे खरीप हंगामाचे आव्हान आहे. हवामान विभागाने यंदाही चांगला पाऊस होण्याबाबत आश्‍वासित केले आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यातील शेतकरीही आता खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. मात्र, "लॉक डाउन'च्या स्थितीत त्यांना पेरणीसाठी आवश्‍यक बियाणे, खते, कीटकनाशकांसह अन्य कृषी निविष्ठा मिळण्यातील अडचणी सोडविण्याची आत्यंतिक गरज आहे. शेतीकामे करताना होणारी मजुरांची गर्दी, त्यातून "सोशल डिस्टन्सिंग'बाबत होणारी अडचणही लक्षात घ्यावी लागणार आहे. लहान-मोठ्या शेतकऱ्यांना पेरणीसाठी पीक कर्जाची उपलब्धता, हाही महत्त्वाचा प्रश्‍न आहे. 

पारंपरिक बियाण्यांचा हवा वापर 
जिल्ह्यातील शेतकऱ्यांबाबत विचार केला, तर लहान शेतकरी आणि मोठे शेतकरी असे दोन गट होऊ शकतात. यातही छोट्या शेतकऱ्यांकडून गरजेपुरते धान्य विकून अन्य शेतमाल साठवून ठेवण्यावर भर दिला जातो. यातून त्यांचा रोजचा उदरनिर्वाहही भागविला जातो. आता अशा शेतकऱ्यांकडून आंतरमशागतीची कामे सुरू झाली आहेत. या संदर्भात बारीपाडा विकासाचे जनक चैत्राम पवार यांनी सांगितले, की लहान शेतकऱ्यांकडून शेतीकामांसाठी बैलांचा अधिक वापर होतो. तसेच कमी मनुष्यबळात ही कामे केली जातात. तरीही शेतकऱ्यांनी "कोरोना'ला लढा देताना सोशल डिस्टन्सिंग पाळत, मास्क लावत ही कामे केली, तर अडचणी येणार नाहीत. अलीकडच्या काळात पारंपरिक बियाण्यांचा वापर कमी झाला आहे. मात्र, "कोरोना'ची "आपत्ती' ही "इष्टापत्ती' मानत लहान शेतकऱ्यांनी पारंपरिक बियाण्यांचा पेरणीसाठी वापर केला, तर आपल्याला अनेक अडचणींवर मार्ग काढता येईल. या बियाण्यांमुळे कदाचित उत्पन्न कमी येईल. मात्र, पारंपरिक बियाण्यांच्या वापरासाठी ही एक चांगली संधी असेल आणि शेतकऱ्यांचा बियाण्यांवर होणारा खर्चही कमी होईल. 

शेतकरी प्रोड्युसर कंपन्यांना वाव 
श्री. पवार म्हणाले, की "कोरोना'मुळे उद्‌भवलेल्या संकटात थेट शेतकऱ्यांपर्यंत बियाणे, खते, कीटकनाशके आदी कृषी निविष्ठा पोहोचविण्यासाठी शेतकरी प्रोड्युसर कंपन्यांचा प्रभावीपणे वापर करता येईल. यात अशा कंपन्यांनी त्या-त्या क्षेत्रातील शेतकऱ्यांकडून बियाणे, खते, कीटकनाशकांची आगावू मागणी नोंदवून घ्यावी. कंपन्यांनी त्यानुसार शासन- प्रशासनाकडे मागणी नोंदवावी. शासन- प्रशासनाने अशा शेतकरी प्रोड्युसर कंपन्यांना थेट कंपन्या, डीलरकडून कृषी निविष्ठांचा पुरवठा केला, तर "लॉक डाउन'च्या संकटातही शेतकऱ्यांना घरपोच या कृषी निविष्ठा उपलब्ध होऊ शकतील. यातून सोशल डिस्टन्सिंगही पाळले जाऊन "कोरोना'चा संसर्ग टाळता येईल. तसेच शेतकरी प्रोड्युसर कंपन्यांनाही बळ मिळेल. 

जिल्हा बॅंकेसह राष्ट्रीयीकृत बॅंकांनी शेतकऱ्यांना खरिपासाठी पीक कर्जाच्या उपलब्धतेबाबत तातडीने कार्यवाही करावी. शेतकरी प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांच्या पुरवठ्याबाबत पाठपुरावा झाल्यास "कोरोना'विरुद्धच्या लढ्यास सोशल डिस्टन्सिंग राखून पाठबळ देता येईल. शेतकऱ्यांनीही पूर्वापार चालत आलेल्या "पडजी' पद्धतीचा अर्थात एकमेकांना मदतीचा अवलंब केल्यास कमीत कमी मनुष्यबळात शेतीकामांना मदत होईल. 
- चैत्राम पवार, शेती व पर्यावरणतज्ज्ञ, बारीपाडा, ता. साक्री 

आगामी खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांच्या पुरवठ्याबाबत संस्थेने साक्री तालुक्‍यातील 26 गावांत स्थापन 32 महिला गटांसह निसर्गराज शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून कार्यवाही करता येईल. यातून शेतकऱ्यांना थेट गावापर्यंत बियाणे, खते, औषधांचा पुरवठा सुलभतेने होईल. जिल्हा प्रशासनाने सकारात्मकतेने कार्यवाही केल्यास नक्कीच "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून खरीप हंगामात शेतकऱ्यांना मदत होऊ शकेल. 
- नामदेव नागरे, सहाय्यक संचालक, संजीवनी इन्स्टिट्यूट फॉर एम्पॉवरमेंट ऍण्ड डेव्हलपमेंट, पिंपळनेर 

खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाच्या कृषी विभागातर्फे धुळे जिल्ह्यासाठी आवश्‍यक बियाणे, खते, कीटकनाशके आदींची मागणी संबंधित यंत्रणेकडे नोंदविण्यात आली आहे. यातच शासनाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर "लॉक डाउन'मधून कृषी क्षेत्रासाठी काही निर्बंध शिथिल केले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर कृषी निविष्ठांच्या पुरवठ्यात कुठल्याही अडचणी उद्‌भवणार नाहीत. खरीप पीकनिहाय बियाणे, खतांच्या मुबलक उपलब्धतेवर भर दिला जात आहे. 
- विवेक सोनवणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धुळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com