‘सिव्हिल’मध्ये ‘ते’ व्हेंटिलेटर अखेर पडूनच; आरोग्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली 

‘सिव्हिल’मध्ये ‘ते’ व्हेंटिलेटर अखेर पडूनच; आरोग्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली 

धुळे ः संसर्गजन्य कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने व्हेंटिलेटरसाठी अनेक रुग्णांची मरमर होत असताना, येथील साक्री रोडवरील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ११ आणि संलग्न शिरपूर, दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात मिळून १४, अशी २५ व्हेंटिलेटर पडून असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आणली. यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दौऱ्यावर असताना, दोन दिवसांत व्हेंटिलेटर सुरू करण्याचा आदेश दिला होता. त्याला ‘सिव्हिल’ने केराची टोपली दाखविली आहे. 


सिव्हिलमध्ये वर्षभरापासून व्हेंटिलेटर पडून असल्याचे समोर आल्यावर सत्ताधारी शिवसेनेच्या येथील पदाधिकाऱ्यांनी स्थितीचा स्पॉट पंचनामा केला. या प्रकरणी दोषी वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करत आरोग्यमंत्री टोपे यांना विविध मागण्यांचे निवेदनही दिले होते. त्यानुसार, मंत्री टोपे यांनी हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या देखरेखीत ११ व्हेंटिलेटर दोन दिवसांत सुरू करून अहवाल सादर करण्याचा अहवाल दिला होता. त्याप्रमाणे डॉ. सापळे यांनी दोन दिवस सिव्हिल हॉस्पिटलची व्हेंटिलेटर सुरू करण्याबाबत मानसिकता तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यावर सिव्हिलने दोन व्हेंटिलेटर सुरू केली. मात्र, इतर व्हेंटिलेटरसाठी मनुष्यबळ नसल्याचे कारण पुढे केले आहे.

सिव्हिल प्रशासनाचा ढिम्म कारभार

मनुष्यबळप्रश्‍नी पालकमंत्री सत्तार, आरोग्यमंत्री टोपे यांनी कंत्राटी पद्धतीने भरती करण्याची सूचना दिली आहे. असे असताना व्हेंटिलेटर सुरू करण्याबाबत सिव्हिलच्या सकारात्मक प्रतिसादाअभावी डॉ. सापळे यांच्या प्रयत्नांना पूर्णतः यश येऊ शकले नाही. या पार्श्वभूमीवर त्यांनी मंत्री टोपे यांना वस्तुस्थितिदर्शक अहवाल  पाठविला. असे हिरे मेडिकलच्या व्यवस्थापनाने सांगितले. सिव्हिलने आरोग्यमंत्र्यांच्याच आदेशाला केराची टोपली दाखविल्याने श्री. टोपे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. याशिवाय शिरपूर, दोंडाईचात अनुक्रमे पडून असलेल्या नऊ व पाच व्हेंटिलेटरचा प्रश्‍न निराळाच आहे. 


सिव्हिलमध्ये २३ डॉक्टर, ६० बेड 
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सरासरी २३ डॉक्टर असून, ३६ नर्स व पुरेसे वॉर्डबॉय आहेत. तसेच सिव्हिलला सद्यःस्थितीत ६० बेडचा वापर होत आहे. त्यात तीन भूलतज्ज्ञ, एक फिजिशियन डॉक्टर व्हेंटिलेटरची सुविधा सांभाळू शकतात, असा दावा आहे. असे असताना सिव्हिलमध्ये क्षमतेने व्हेंटिलेटर का सुरू केले जात नाही, असा प्रश्‍न रुग्णांना पडला आहे. याप्रश्‍नी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली जाणार असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.  

संपादन- भूषण श्रीखंडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com