अतिवृष्टीबाबत अनुदानाचा घोळ सुरूच

तुषार देवरे
गुरुवार, 12 मार्च 2020

जिल्ह्यात ऑक्‍टोबर, नोव्हेंबर 2019 मध्ये क्‍यार व महाचक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अवेळी पावसामुळे तालुक्‍यातील पिकांचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या आपद्‌ग्रस्त शेतकऱ्यांना मदत व सवलत शासनाने दिली आहे.

देऊर : धुळे तालुक्‍यात खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीग्रस्तांच्या अनुदानाचा घोळ सुरूच आहे. जिल्हास्तरावर अनुदान येऊनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग झालेले नाहीत. त्यामुळे तालुक्‍यातील बहुतांश शेतकरी धुळे तहसील कार्यालयात रोज खेटे घालत आहेत. मात्र, त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने शेतकरी वर्गात चिंतेसह नाराजीचे वातावरण आहे. 

हेपण पहा - भोंदूबाबाचा प्रताप...पूजेसाठी बोलावले...मग केली अश्‍लिल व्हिडीओ क्‍लिप !

जिल्ह्यात ऑक्‍टोबर, नोव्हेंबर 2019 मध्ये क्‍यार व महाचक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अवेळी पावसामुळे तालुक्‍यातील पिकांचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या आपद्‌ग्रस्त शेतकऱ्यांना मदत व सवलत शासनाने दिली आहे. तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठी दोन टप्प्यात 63 कोटी 71 लाख, 80 हजार, पाचशे रुपये मंजूर अनुदान प्राप्त झाले आहे. हे अनुदान तहसील कार्यालयाने बॅंकेत वर्ग केले. बॅंकेने "डीडीसी"सह इतर बॅंकांकडे निधी वर्ग केला. मात्र, हे अनुदान तालुक्‍यात बोटावर मोजण्याइतकेच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले. त्यामुळे गावागावात बहुतांश शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत. 
शेतकऱ्यांच्या बॅंक खात्याला तांत्रिक अडचणीचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे अद्याप तब्बल तीन कोटी रुपये संबंधित बॅंकेत अधांतरी पडले आहेत. त्यात बॅंक चुकीचे खाते क्रमांक, चुकीचे आधार क्रमांक, शेतकरी मृत, इतर हक्क आदी दिशाभूल करणारी कारणे आहेत. हे तीन कोटी व उर्वरित तिसरा टप्प्यातील येणारे अनुदान तत्काळ खात्यावर वर्ग करून तिढा सोडवावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी धुळे, साक्री, शिंदखेडा, शिरपूर तालुक्‍याचे तहसीलदारांना 21नोव्हेंबर, 17 डिसेंबरला अनुदानाचे पत्र दिले आहे. गावस्तरावर शेतकऱ्यांकडून माहिती घेताना तलाठींनी काळजी घेणे अपेक्षित होते. मात्र, बहुतांश शेतकऱ्यांचे चुकीचे आधार क्रमांक एक्‍सल शीटला नोंद केले आहे. तेच एक्‍सेल शीट पुढे तालुक्‍याला पाठवले. धुळे तहसील कार्यालयाने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देणे आवश्‍यक आहे. शेतीपिकासाठी नुकसान भरपाई प्रति हेक्‍टरी आठ हजार रुपये, बहुवार्षिक (फळबागा)ला अठरा हजार रुपये मदत आहे. स्थानिकस्तरावर अनुदान वर्ग जमा झालेल्या बॅंकांनी शेतकऱ्यांना सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 
 
अतिवृष्टी अनुदान खात्यावर अद्याप जमा झाले नाही. धुळे तहसील कार्यालयात येऊनही समाधानकारक उत्तर मिळत नाही. अनुदान मदत तत्काळ जमा व्हावे 
- अशोक साहेबराव पाटील, शेतकरी, सायने (ता. धुळे) 
 

गावातील इतर शेतकऱ्यांना अनुदान मिळाले. मात्र, आई लीलाबाई पंडित पाटील यांच्या खात्यावर मदत जमा झाली नाही. चौकशीसाठी तहसील कार्यालयात आलो. 
- ब्रिजलाल पंडित पाटील, शेतकरी, लोहगड (ता. धुळे) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule heavy rain farming state goverment anudan froad