हिरे महाविद्यालयात पदव्युत्तर अकरा अभ्यासक्रमांना मान्यता 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 June 2020

हिरे वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना 1989 मध्ये झाली. महाविद्यालयाशी संलग्न 545 खाटांचे सुसज्ज सर्वोपचार रुग्णालय कार्यरत आहे. सद्य:स्थितीत महाविद्यालयाची पदवीपूर्व (एमबीबीएस) प्रवेशक्षमता 150 विद्यार्थी आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने या महाविद्यालयास 11 विषयांमध्ये पदव्युत्तर (एमडी, एमएस) अभ्यासक्रमांना 46 विद्यार्थी प्रवेशास मान्यता प्रदान केली. 

धुळे : नवी दिल्ली येथील भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने 2020-21 या शैक्षणिक वर्षापासून श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात 11 विषयांत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना मान्यता दिली. एकूण 46 जागा असतील, या 11 विषयांपैकी स्त्री रोग व प्रसूतिशास्त्र याविषयात पहिल्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी एका विद्यार्थ्याने प्रवेश नोंदविला असून ते रुजू झाले आहेत. उर्वरित जागांवरील प्रवेशप्रक्रिया लवकरच पूर्ण होऊन विद्यार्थी रुजू होतील, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली. 
शहरात हिरे वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना 1989 मध्ये झाली. महाविद्यालयाशी संलग्न 545 खाटांचे सुसज्ज सर्वोपचार रुग्णालय कार्यरत आहे. सद्य:स्थितीत महाविद्यालयाची पदवीपूर्व (एमबीबीएस) प्रवेशक्षमता 150 विद्यार्थी आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने या महाविद्यालयास 11 विषयांमध्ये पदव्युत्तर (एमडी, एमएस) अभ्यासक्रमांना 46 विद्यार्थी प्रवेशास मान्यता प्रदान केली. 

अभ्यासक्रम व विद्यार्थिक्षमता 
अभ्यासक्रमाची नावे व विद्यार्थिक्षमता अशी : जीवरसायनशास्त्र, बधिरीकरण शास्त्र- प्रत्येकी 7, शरीरविकृतीशास्त्र, नेत्रशल्यचिकित्सा शास्त्र प्रत्येकी- 2, बालरोग चिकित्साशास्त्र, कान- नाक- घसा शास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, अस्थिव्यंगोपचारशास्त्र- प्रत्येकी 3, बधिरीकरणशास्त्र- 7, शल्यचिकित्साशास्त्र, स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र- प्रत्येकी 6, औषधवैद्यकशास्त्र- 4. एकूण 46 विद्यार्थी क्षमतेपैकी अखिल भारतीय कोट्याअंतर्गत (50 टक्के) आज डॉ. जिगरकुमार सामाणी यांनी स्त्री रोग प्रसूतिशास्त्र विषयासाठी प्रवेश घेतला. उर्वरित अभ्यासक्रमाचे प्रवेश लवकरच पूर्ण होतील. त्यामुळे रुग्णालयात 24 तास तज्ज्ञ डॉक्‍टरांची उपलब्धता असेल. उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा, तातडीच्या प्रसंगी तज्ज्ञ डॉक्‍टरांचे पथक उपलब्ध होऊ शकेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule hire medical collage new 11 study corse