धुळ्यात लोकप्रतिनिधींचा "सज्ज'बाबत पोकळा दावा 

धुळ्यात लोकप्रतिनिधींचा "सज्ज'बाबत पोकळा दावा 

धुळे ः जिल्हा सर्वोपचार रुग्णालय, जिल्हा शासकीय रुग्णालयात बहुसंख्य पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी भेट देतात. तयारीसह स्थितीचा आढावा घेतात. पुरेसा औषधसाठा आहे, असे सांगतात. चकाचक विशेष कक्ष पाहून जिल्हा "कोरोना'शी मुकाबल्यासाठी सज्ज असल्याचा दावा करतात. प्रत्यक्षात मुकाबल्यासाठी आवश्‍यक वैद्यकीय पथकांना आवश्‍यक "पीपीई', ई- 95 मास्क, सॅनिटायझर, पुरेसे व्हेंटिलेटर यासह विविध बाबी आजही येथे उपलब्ध नसताना नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी केवळ देखावा निर्माण करत असल्याचे कुणी म्हटले वावगे ठरू नये. 

एरवी किरकोळ कारणांवरूनही श्रेयासाठी धडपडणारे लोकप्रतिनिधी या संकटकाळातील साधने, वस्तू उपलब्धतेसाठी का झटताना दिसत नाहीत? राज्यात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस महाविकास आघाडीचे सरकार असताना, केंद्रात भाजपचे सरकार असतानाही स्थानिक आरोग्य यंत्रणेबाबत इतकी गंभीर स्थिती असेल तर संबंधितांकडून दाखविला जाणारा कळवळा कुणासाठी, असा प्रश्‍न आहे. या पक्षाचे नेते, पदाधिकाऱ्यांनी सरकार पातळीवरून प्रश्‍न मार्गी लावण्यापेक्षा तेच मागण्यांचे पत्रक काढत असल्याचा मोठा विरोधाभास येथे दिसून येतो. 

पालकमंत्री सत्तार गायब 
जळगाव, नाशिकपर्यंत "कोरोना' पोहोचल्यावर किमान आता तरी प्रशासकीय आणि आरोग्याच्या स्थितीबाबत आढावा घेण्यासाठी शिवसेनेचे नेते व पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी धुळे दौऱ्यावर येणे अपेक्षित होते. ते आतापर्यंत आलेले नाही. "कोरोना'च्या स्थितीमुळे त्यांना दौऱ्यावर येणे शक्‍य नसेल तर ते जिल्हाधिकाऱ्यांना आदेशित करून त्रुटींची पूर्तता करण्यासाठी सूचना देऊ शकतात. जिल्हाधिकाऱ्यांना अपेक्षित मदत मंत्रालयातून मिळवून देऊ शकतात. परंतु, तसे घडलेले नाही. 

आकड्यांवर चालतोय जिल्हा... 
मुख्यमंत्री, मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, पोलिस महासंचालक, विशेष पोलिस महानिरीक्षक आदी प्रत्येक जिल्ह्याशी व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे संपर्कात आहे. यात केवळ आकडेवारी मांडली जात असल्याने जिल्हा या सांख्यिकीय माहितीच्या बळावर "दक्ष' दिसत आहे. प्रत्यक्षात, वस्तुस्थिती वेगळी असून पंतप्रधान, मुख्यमंत्री वारंवार गर्दी टाळणे, अत्यावश्‍यक सेवा वगळता कुणीही बाहेर दिसू नये म्हणून आवाहन करत असताना पोलिसांचा वचक दिसत नसल्याने चिंता व्यक्त होते. 

तीन कोटी 8 लाखांचा निधी प्राप्त 
राज्य सरकारने जिल्ह्याला "कोरोना'शी मुकाबल्यासाठी आतापर्यंत तब्बल 3 कोटी 8 लाखांचा निधी दिला आहे. यात एक कोटींचा विशेष निधी, तर नियोजन विभागाकडून हिरे महाविद्यालयासह जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाला 2 कोटी 28 लाखांचा निधी दिला गेला आहे. यात एक कोटीतून प्राप्त 80 लाखांचा निधी जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद, महापालिकेला वाटप झाला आहे. महापालिका आणखी निधी मिळावा, असा तगादा लावत आहे. जिल्हा सर्वोपचार रुग्णालयास दिलेल्या 2 कोटी 28 लाखांपैकी 1 कोटी 2 लाखांचा निधी रुग्णालयाने काढून घेतला आहे. तरीही आरोग्य यंत्रणा जेवढी गांभीर्याने तयारीत पाहिजे तितकी ती नसल्याने चिंता व्यक्त होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com