esakal | एकाचे घर दुसऱ्याचे भांडण अन्‌ त्‍यात सरपंचाची उडी; मग झाले काय पहा
sakal

बोलून बातमी शोधा

house construction

पेरेजपूरला हेमंत निंबा शेवाळे यांचे वडिलोपार्जित घर असून, या घराची भिंत पाण्यात भिजल्याने पडीत झाली. त्यामुळे जीर्ण भिंत पाडून ती नवीन बांधण्याचे त्यांनी ठरविले. आज सकाळी आठच्या सुमारास या भिंतीचे बांधकाम करण्यास सुरवात केली.

एकाचे घर दुसऱ्याचे भांडण अन्‌ त्‍यात सरपंचाची उडी; मग झाले काय पहा

sakal_logo
By
जगदीश शिंदे

धुळे : पेरेजपूर (ता. साक्री) येथे दोन कुटुंबांत भिंतीच्या बांधकामावरून वाद सुरू होता. याचवेळी सरपंचाने केलेल्या हस्तक्षेपाचे पर्यवसान हाणामारीत झाल्याने आज रंगलेल्या भांडणाच्या त्रिकोणाची दिवसभर चर्चा रंगली होती. सरपंच मनोज देसले आणि विमलबाई अहिरे यांच्यात झालेल्या मारहाणीची परस्परविरोधी फिर्याद दाखल झाली असून, भिंत बांधकाम करणाऱ्या पूनम शेवाळे तसेच अहिरे कुटुंबीयांनीही साक्री पोलिस ठाण्यात परस्परविरोधात फिर्याद दाखल केली आहे. 

नक्‍की वाचा- ऑनलाईन मोबाईल रिचार्ज करताय...तर मग थांबा अगोदर हे वाचा दोघे कसे फसले


पेरेजपूरला हेमंत निंबा शेवाळे यांचे वडिलोपार्जित घर असून, या घराची भिंत पाण्यात भिजल्याने पडीत झाली. त्यामुळे जीर्ण भिंत पाडून ती नवीन बांधण्याचे त्यांनी ठरविले. आज सकाळी आठच्या सुमारास या भिंतीचे बांधकाम करण्यास सुरवात केली. यावेळी त्यांच्याशेजारी राहणाऱ्या विमलबाई गुलाब अहिरे, पती गुलाब अहिरे व मुलगा राहुल अहिरे यांनी भिंत बांधकामावर आक्षेप घेत वाद निर्माण केला. त्यामुळे हेमंत शेवाळे यांनी सरपंच मनोज देसले यांना या वादाच्या निवारणासाठी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून घटनास्थळी बोलावले. सरपंच देसले घटनास्थळी आल्यानंतर शेवाळे व अहिरे कुटुंबीयांमध्ये भांडण सुरू होते. यावेळी सरपंच देसले यांनी दोन्ही कुटुंबांमधे वाद वाढत गेल्याने तो थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु वाद अधिक वाढून शिवीगाळ व मारहाण करण्यापर्यंत प्रकरण गेले. 

अन्‌ सरपंच– महिला भिडले
घटनेत सरपंच देसले आणि विमलबाई अहिरे यांच्यातही मारहाण झाली. यानंतर अहिरे कुटुंबीयांनी पूनम शेवाळे व हेमंत शेवाळे तसेच सरपंच देसले यांनाही मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावेळी ग्रामस्थांनी मध्यस्थी करून भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. याबाबत साक्री पोलीस ठाण्यात विमलबाई अहिरे (वय ६०) यांनी सरपंच देसले व हेमंत शेवाळे यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली. तर सरपंच देसले यांनी व पूनम शेवाळे (वय 39) यांनीही स्वतंत्रपणे विमलबाई अहिरे, गुलाब अहिरे व राहुल अहिरे यांच्याविरोधात शिवीगाळ व मारहाणीची फिर्याद दिली. हवालदार नागेश्वर सोनवणे तपास करीत आहेत. 
 


संपादन ः राजेश सोनवणे